छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जिथं महिलांना आदराचं स्थान दिलं जातं, त्याच महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये मात्र अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन थरकाप उडवणाऱ्या घटना समोर आल्या. या घटना पाहिल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नेमका उरलाय कुठे? असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला आहे. एकीकडे आपण डिजिटल इंडिया आणि प्रगतीच्या गप्पा मारतोय, तर दुसरीकडे आपल्याच माता-भगिनी सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकतात का, हा प्रश्न निर्माण झालाय. कारण, एका बाजूला ग्रामीण भागातील निर्जन स्थळी एका तरुणीला गाठून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला जातो, तर दुसरीकडे ही घटना ताजी असतानाच चक्क शहराच्या उपनगरातील एका गजबजलेल्या कॉम्प्लेक्सच्या महिला वॉशरुममध्ये शिरून एका विवाहित महिलेवर अत्याचार केला जातो. या दोन्ही घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय. पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, पण या घटनांमागील क्रूरता आणि मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. नेमक्या या दोन्ही घटना कुठे, कधी आणि कशा घडल्या? पोलिसांची कारवाई काय झाली? आणि यापुढे महिला सुरक्षेसाठी काय पावले उचलली पाहिजेत? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि पुराव्यांसह पाहणार आहोत.
चला तर मग, सुरुवातीला जाणून घेऊयात पहिल्या घटनेबद्दल… घटना घडलीये अहिल्यानगर तालुक्यातील देवगाव परिसरात. हा परिसर निसर्गरम्य आणि पवनचक्क्यांसाठी ओळखला जातो. अनेकदा तरुण-तरुणी किंवा पर्यटक या भागात फिरण्यासाठी जातात. नगर शहरात खासगी नोकरी करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने आपल्या मानलेल्या भावासोबत त्या परिसरात पवनचक्की पाहण्यासाठी जाण्याचा बेत आखला. दोघेही तिथे पोहोचले. निसर्गाचा आनंद घेत होते. पण, त्यांना काय माहिती की काही विकृत नजरा त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत. परिसर निर्जन असल्याचा गैरफायदा घेत देवगाव येथीलच दोन स्थानिक तरुण तिथे दुचाकीवरून आले. त्यांनी आधी त्या तरुणीसोबत असलेल्या तरुणाला अडवले, त्याला शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तो तरुण स्वतःला आणि त्या तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या दोन नराधमांच्या डोक्यावर विकृती स्वार झाली होती. त्यांनी त्या तरुणाला बाजूला पाडले आणि त्या असहाय्य तरुणीला बळजबरीने आपल्या दुचाकीवर बसवले. तिथून तिला एका अत्यंत निर्जन आणि अंधाऱ्या ठिकाणी नेण्यात आले आणि तिथे त्या दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. काही वेळाने तेथे परिसरातील इतर दोन तरुण आले. त्यांनी या मुलीला व मुलाला धीर देत पोलिसांना घडनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलिसांना एकाच वेळी तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी रात्रीतून कोंबिंग ऑपरेशन आणि शोध मोहीम राबवली. अखेर पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत संदेश गोरक्षनाथ शिंदे आणि मोहित अशोक खळे, हे दोघेही देवगावचेच रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना २१ सप्टेंबरपर्यंत, म्हणजेच ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मित्रांनो, देवगावची ही घटना ताजी असतानाच आणि पोलीस त्याचा तपास करत असतानाच, अवघ्या काही तासांत शहराच्या उपनगरातून दुसरी एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली. ही घटना घडली मंगळवारी, १५ सप्टेंबरच्या रात्री. एका मोठ्या कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूला असलेल्या महिला वॉशरुमच्या परिसरात. रात्री पावणेनऊच्या सुमारास एक २२ वर्षीय विवाहित महिला या कॉम्प्लेक्सच्या परिसरातील वॉशरुमचा वापर करण्यासाठी आत गेली. तेव्हा तिथे दबा धरून बसलेल्या एका नराधमाने तिचा पाठलाग केला आणि महिला वॉशरुममध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. तिथे त्याने त्या विवाहित महिलेवर अत्याचार केला. महिलेचा आरडाओरड ऐकून या महिलेचा पती व दीर घटनास्थळी आले. त्यांनी दरवाजा तोडून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निसटला. बुधवारी, १६ सप्टेंबरला पहाटेच तोफखाना पोलीस ठाण्यात पिडीतेने तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपीचे नाव देविदास खराद असून तो शनिधाम रोड, भारत बेकरीच्या मागे, बोल्हेगाव येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
आता या दोन्ही घटना कायदेशीर दृष्टिकोनातून किती गंभीर आहेत, हे समजून घेऊया. नवीन कायद्यानुसार सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये दोषी आढळल्यास आजन्म कारावास किंवा फाशीच्या शिक्षेपर्यंतची तरतूद करण्यात आली आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी ज्या पद्धतीने दोन्ही प्रकरणांमध्ये वेगाने सूत्रे हलवली, त्यावरून पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसते. पण प्रश्न हा निर्माण होतो की, गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी पकडणे ही एक बाजू झाली. पण असे गुन्हे घडूच नयेत यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत? पोलिसांची गस्त ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर किंवा निर्जन स्थळांवर किती वेळा असते? हा आता चर्चेचा विषय बनला आहे.
मित्रांनो, एक विचार करा… जेव्हा एखादी बहीण किंवा महिला घराबाहेर पडते, तेव्हा तिच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ पोलिसांचीच आहे का? की आपली सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज आहे? या दोन्ही घटनांमधून काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न समोर येतात जे आपण प्रशासनाला आणि समाजाला विचारले पाहिजेत:
पॉइंट १ :
निर्जन स्थळांची सुरक्षा – देवगाव सारख्या पर्यटन किंवा फिरण्याच्या ठिकाणी जिथे तरुण-तरुणी जातात, तिथे पोलीस चौकी किंवा फिरते पोलीस पथक का नसावे?
पॉइंट २ :
कॉम्प्लेक्स आणि कमर्शियल बिल्डिंग्स – शहरातील कॉम्प्लेक्सच्या वॉशरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षारक्षक तैनात करणे बंधनकारक का केले जात नाही? अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था का नसते?
पॉइंट ३ :
कायद्याचा धाक – अशा नराधमांना कायद्याची भीती का वाटत नाही? फाशी किंवा कठोर शिक्षेचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून महिनाभरात निकाल का लागत नाही?
जोपर्यंत अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना समाजासमोर आणून कायद्याचा सर्वात मोठा दणका दिला जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. अहिल्यानगरमधील या दोन्ही घटनांनी आपल्याला विचार करायला भाग पाडले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी केवळ कायदे असून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी तितकीच कठोर व्हायला हवी. तुमचं या संपूर्ण प्रकरणावर काय मत आहे? महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी प्रशासनाने अजून कोणते ठोस निर्णय घेतले पाहिजेत?





