२५० वर्ष… तब्बल अडीचशे वर्ष झाली. पण या वेशीचा दरवाजाला ओलांडायची हिंमत आजही कुणी करत नाही..! दिवसाढवळ्या लोक या रस्त्यावरून जाताना १० वेळा विचार करतात. आणि सूर्य मावळतीला गेला की… या वेशीच्या आसपास संपूर्ण सन्नाटा पसरतो. स्थानिक लोक मानतात की ही वेस ‘शापित’ आहे! इथून जो कोणी पडला, तो जिवंत परत आलाच नाही..! महाराष्ट्रातील एका अशा शहराची ही गोष्ट आहे, जिथे एका बाजूला मृत्यूचा आणि शापाचा हा थरारक दरवाजा उभा आहे… आता आम्ही सांगतो ते विज्ञानयुगात कुणालाच खरं वाटणार नाही. अतिशयोक्ती वाटेल. कदाचित ही अतिशयोक्तीही असेल… पण या वेशीच्या शापाचा इतिहास मात्र गेल्या २५० वर्षांपासून आहे तसाच आहे… आपण आज जी गोष्ट पाहणार आहोत, ती श्रीगोंद्याची… श्रीगोंद्यातील त्या शापित दिल्ली वेशीची… आजच्या व्हिडीओत आम्ही श्रीगोंद्याचे दोन रहस्य उलगडणार आहोत. काही स्थानिक लोककथा आणि ऐतिहासीक संदर्भांचा त्यासाठी पुरावा घेतला.
मित्रांनो, आजची गोष्ट आपल्या श्रीगोंदा शहराची आहे. या शहराच्या मातीत भारताच्या एका सर्वात मोठ्या ज्योतिर्लिंगाच्या पुनरुत्थानाचे रहस्य दडलेलं आहे..! होय, वेरुळचे जगप्रसिद्ध ‘घृष्णेश्वर मंदिर’! पण या मंदिराचा आणि सुरुवातीला सांगितलेल्या एका शापित वेशीचा काय संबंध? इतिहास सांगतो की, घृष्णेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी लागणारा अथांग पैसा, सोन्याच्या मोहरा आणि हुंड्या याच शहरातल्या एका पेढीतून पुरवण्यात आल्या होत्या… ती पेढी होती ‘शेठप्पा नाईक पुंडे’ यांची..! एकाच शहरात मृत्यूचा दरवाजा आणि दुसऱ्या बाजूला देवाच्या मंदिराला जिवंत करणारी पेढी! हे रहस्यमयी शहर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘श्रीगोंदा’! आज आपण श्रीगोंद्याचा असा इतिहास उलगडणार आहोत, जो ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल!
सर्वप्रथम जाऊया श्रीगोंद्याच्या त्या वेशीकडे, जिथे आजही भीतीचा पहारा आहे… तिचे नाव ‘दिल्ली वेस’. आजच्या आधुनिक युगात जिथे सायन्स आणि तंत्रज्ञान सर्वोच्च शिखरावर आहे, तिथे श्रीगोंद्याचे स्थानिक लोक आजही कोणत्याही शुभ कामासाठी किंवा लांबच्या प्रवासासाठी या वेशीतून बाहेर पडत नाहीत. लग्नकार्य असो, नवीन गाडी असो किंवा एखादी आनंदाची गोड बातमी… या वेशीचा रस्ता पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. या भीतीमागे कोणती भुताटकी आहे की एखादा भयानक इतिहास?
हा कोणताही अंधविश्वास नाही, तर यामागे एका ऐतिहासिक युद्धाची करुण आणि रक्तरंजित कहाणी आहे. वर्ष होतं १७६१! मराठ्यांचे अथांग सैन्य अहमदशाह अब्दालीचा खात्मा करण्यासाठी उत्तर भारताकडे निघालं होतं. महादजी शिंदे यांच्या सैन्याची एक बलाढ्य तुकडी, शेकडो तरुण मराठा योद्धे अत्यंत उत्साहात, ‘हर हर महादेव’च्या गर्जनेत याच दिल्ली वेशीतून बाहेर पडले. पण… त्यांना ठाऊक नव्हतं की ते मृत्यूच्या जबड्यात पाऊल टाकत आहेत.
पानिपतच्या त्या भीषण युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रातील लाखो वीरांनी भगव्या ध्वजासाठी मरणाला कवटाळलं. असं म्हटलं जातं की श्रीगोंद्याच्या या वेशीतून जे योद्धे छाती ठोकून बाहेर पडले होते, त्यांच्यापैकी एकही माणूस, एकही सैनिक आपल्या घरी परत येऊ शकला नाही… या वेशीच्या बाहेर पाऊल टाकणं म्हणजे मृत्यूशी करार करणं, असा एक अदृश्य शाप या वेशीला लागला. युद्धातील त्या हजारो आत्म्यांचा आक्रोश आणि त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू या वेशीच्या दगडांमध्ये गोठून राहिले. तेव्हापासून ही वेस ‘अशूभ’ आणि ‘शापित’ मानली जाऊ लागली. २५० वर्ष उलटली, पिढ्या बदलल्या, पण या दिल्ली वेशीचा तो काळा इतिहास आणि त्यातून मिळणारा अशुभ संकेत आजही स्थानिक लोकांच्या मनात जिवंत आहे! अर्थात काही जण तो पाळतात, अन् काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात, हा भाग निराळा…
पण मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की श्रीगोंदा फक्त या भयानक दुःखाचे केंद्र आहे, तर थांबा! कारण इतिहास कधीच एका बाजूने लिहिता येत नाही. याच श्रीगोंद्यात एक असं वैभव लपलं होतं, ज्याने भारताच्या संस्कृतीला आणि आदिशक्तीला पुन्हा जिवंत केलं. आपण बोलतोय १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरुळच्या ‘घृष्णेश्वर मंदिरा बद्दल’! मध्ययुगीन काळात श्रीगोंदा हे मराठा साम्राज्यातील सर्वात मोठ्या आर्थिक व्यवहारांचे केंद्र होतं. इथे देशोदेशीचे व्यापारी आणि सावकार असायचे. आणि याच श्रीगोंद्यात एक अत्यंत प्रतिष्ठित आणि अफाट श्रीमंत नाव होतं – ‘शेठप्पा नाईक पुंडे’! शेठप्पा नाईक पुंडे यांची सावकारी पेढी म्हणजेच त्या काळातील बँक इतकी विशाल होती की, दिल्लीच्या बादशहापासून ते साताऱ्याच्या छत्रपतींपर्यंत त्यांच्या नावाचा वचक होता.
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आणि पुढे जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या घृष्णेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराचा संकल्प केला, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न होता – अथांग निधीचा! हजारो कारागीर, दगड आणि बांधकामासाठी लागणारा प्रचंड पैसा येणार कुठून? तेव्हा मदतीला धावून आली श्रीगोंद्याची हीच ‘शेठप्पा नाईक पुंडे’ यांची पेढी… या पेढीतून लाखोंच्या हुंड्या आणि सोन्याची नाणी थेट वेरुळला पाठवली गेली. शेठप्पा नाईक पुंडे यांच्या बँकेने दिलेल्या भक्कम आर्थिक पाठबळामुळेच घृष्णेश्वर मंदिराचे काम एका दिवसासाठीही थांबले नाही. म्हणजेच, आज ज्या पवित्र ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आपण जातो, त्या मंदिराच्या प्रत्येक दगडात श्रीगोंद्याच्या शेठप्पा नाईक पुंडे यांच्या पेढीचे योगदान आणि त्यांची पुण्याई जोडलेली आहे!
विचार करा… एकाच शहराचे हे दोन कमालीचे पैलू! एका बाजूला २५० वर्षांपासून पानिपतच्या पराभवाचे अश्रू आणि शापाचे सावट घेऊन उभी असलेली ‘दिल्ली वेस’… तर दुसऱ्या बाजूला थेट महादेवाच्या मंदिराला उभारी देणारी ‘शेठप्पा नाईक पुंडे’ यांची वैभवशाली पेढी! हाच आहे आपल्या महाराष्ट्राचा खरा आणि थक्क करणारा इतिहास! मित्रांनो, श्रीगोंद्याचा हा थरारक इतिहास तुम्हाला कसा वाटला? तुम्ही कधी या दिल्ली वेशीवरून गेला आहात का?





