
अहिल्यानगरमध्ये हक्काचं घर मिळवण्यासाठी केलेला संघर्ष एका कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना ठरला. बुक केलेल्या फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने ४९ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आनंद खिराजी धिवर असं मृत व्यक्तीचं नाव असून ते वैद्य कॉलनी, जामखेड रोड परिसरात राहत होते. आनंद धिवर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तबरेज अकबर शेख या बिल्डरकडून टू बीएचके फ्लॅट बुक केला होता. मात्र, ठरल्याप्रमाणे टू बीएचकेऐवजी वन बीएचके फ्लॅट देण्याचा आग्रह धरला जात असल्याचा आरोप आहे.
टू बीएचके फ्लॅटची मागणी केल्यानंतर बिल्डरने शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कर्जाची फाईल पुढे न गेल्यानेही आनंद धिवर तणावात होते, अशी तक्रार आहे. अखेर त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांचे पुत्र प्रथमेश धिवर यांच्या फिर्यादीवरून १५ ऑक्टोबर रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बिल्डरविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात पुढील तपास करत आहेत.





