Explained

१९९६ ची ती रात्र, जेव्हा नगरच्या ५२ महिला दिल्लीतून गायब झाल्या होत्या! काय होता तो किस्सा?

साल होतं, साधारणः १९९५- १९९६ चं. त्याकाळी आजच्यासारखा प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन नव्हता. व्हॉट्सॲप नव्हतं. जीपीएस ट्रॅकिंग वगैरे तर अगदी लांबचा विषय… अशा काळात, नगर जिल्ह्यातील तब्बल ५२ महिलांची एक बस, दिल्लीत गायब झाली होती… होय, महिलांना दिल्ली फिरायला घेऊन गेलेली अख्खी बसचं गायब झाली होती… रात्रीचे नऊ वाजले, दहा वाजले, ११ वाजले, १२ वाजले… पण या महिलांचा व त्या बसचा काहीच पत्ता लागत नव्हता…

त्याकाळी दिल्लीतील क्राईम अत्युच्च शिखरावर होता…आणि विशी-तिशीतील महिलांची बस गायब होणं, ही काही साधी गोष्ट नव्हती… काय झालं असेल? महिलांना कुणी गायब केलं असेल? या अनोळख्या शहरात या महिलांबाबत काही बरं-वाईट झालं असेल तर..? अशा एक ना अनेक प्रश्नांनी इतर महिलांच्या काळजाचा ठोका चुकला… महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील ५२ लेकी-बाळी बेपत्ता होणं, म्हणजे काय भयानक प्रकार असेल, याचा विचार करा… पण ही धकधक थेट भल्या सकाळी संपली. त्या ५२ महिला अगदी सुखरुप सापडल्या… नेमकं काय झालं होतं? आणि त्या ५२ महिलांबाबत काय घडलं होतं? नगर जिल्ह्यातील या ५२ महिलांचा आणि त्यांना मदत करणाऱ्या नगरच्या सुपुत्राचा, आणि एका मोठ्या नेत्याचा हाच, किस्सा आज आपण पाहणार आहोत.

हा किस्सा नीट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे, म्हणजे १९९५-९६ च्या काळात जावं लागेल. तो काळ भारतीय राजकारणात आणि समाजकारणात मोठ्या बदलांचा होता. महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं होतं, तर केंद्रात आघाडी सरकारांचे प्रयोग सुरू होते. त्या काळात ग्रामीण भागातील आरोग्य आणि बालविकासाचा कणा असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करत होत्या.

आज आपण ज्या महिलांना समाजाचा महत्त्वाचा घटक मानतो, त्यांना त्या काळात आपल्या न्याय्य हक्कांसाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. शासकीय सेवेत सामावून घेणे, मानधनात वाढ करणे आणि कामाची सुरक्षितता या मागण्यांसाठी देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिल्लीत धडक देण्याचं ठरवलं. दिल्लीतील या आंदोलनाला अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला.

संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहता आणि संपूर्ण नगर जिल्ह्यातून साधारणः शे-दीडशेच्या आसपास महिला या आंदोलनासाठी दिल्लीला रवाना झाल्या. यातील अनेक महिला अशा होत्या ज्यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच महाराष्ट्राची सीमा ओलांडली होती. त्यांच्यासाठी दिल्ली म्हणजे केवळ पुस्तकात वाचलेली किंवा रेडिओवर ऐकलेली देशाची राजधानी होती.

दिल्लीत पोहोचल्यानंतर या सर्व महिलांनी दिवसभर जोरदार घोषणाबाजी करत आपलं आंदोलन यशस्वी केलं. संध्याकाळपर्यंत आंदोलनाची सांगता झाली. आता इतक्या लांब दिल्लीपर्यंत आलोच आहोत, तर राजधानी दिल्ली पाहून घ्यावी, अशी स्वाभाविक इच्छा या महिलांच्या मनात निर्माण झाली. त्याकाळी प्रवासाचे नियोजन आजच्यासारखे सोपे नव्हते. काही महिला कार्यकर्त्यांनी मिळून या महिलांसाठी चार मोठ्या बसेसची व्यवस्था केली. प्रत्येक बसमध्ये साधारण ५० ते ५५ महिला बसवण्यात आल्या.

ठरल्याप्रमाणे या चारही बसेस दिल्लीतील प्रसिद्ध ठिकाणे— जसे की इंडिया गेट, लाल किल्ला, राजघाट, कुतुबमिनार दाखवण्यासाठी रवाना झाल्या. संध्याकाळी दिल्ली दर्शन करून रात्री आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतण्याचे नियोजन होते. संध्याकाळ उलटून रात्र झाली. ठरल्याप्रमाणे एक-एक करत तीन बसेस मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप परतल्या. त्या बसमधील महिला उतरल्या, जेवणाची तयारी सुरू झाली. पण… चौथी बस अजून आली नव्हती!

ज्या बस आल्या होत्या, त्यातील महिलांना वाटलं की दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये चौथी बस अडकली असेल. पण जेव्हा रात्रीचे दहा वाजले, अकरा वाजले आणि बाराचा ठोका पडला, तेव्हा मात्र सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. त्या चौथ्या बसमध्ये ५२ महिला होत्या आणि त्यातील बहुतांश महिला या संगमनेर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील होत्या. आजचा काळ असता तर एका सेकंदात फोन लागला असता. पण १९९६ मध्ये ना कुणाकडे मोबाईल होता, ना बसमध्ये वायरलेस सिस्टिम होती. फक्त एसटीडी बूथवरूनच संपर्क साधता येत होता, पण बस कुठे आहे हेच माहीत नसल्याने संपर्क साधणार तरी कसा होणार..?

सगळीकडे एकच खळबळ उडाली. अनोळखी शहरात ५२ महिलांसह बस गायब होणे ही साधी गोष्ट नव्हती. ड्रायव्हरने बस कुठे भलतीकडे तर नेली नाही ना? कुठे अपघात तर झाला नाही ना? काही अनुचित प्रकार तर घडला नाही ना..? असे अनेक भयानक विचार बाकीच्या महिलांच्या मनात येऊ लागले. शेवटी, रात्रीच्या अंधारातच काही महिला दिल्लीतील निजामुद्दीन पोलीस ठाण्यात पोहोचल्या. पोलिसांना सर्व प्रकार सांगितला गेला. पण दिल्ली पोलिसांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. शहराची मोठी लोकसंख्या पाहता, एका रात्रीत बस शोधणे पोलिसांसाठीही मोठं आव्हान होतं. पोलिसांची संथ हालचाल पाहून या महिलांचे धाबे दणाणले.

अनोळखी दिल्लीत कुणी ओळखीचं नव्हतं. भाषेचाही प्राँब्लेम होता. मराठी आणि त्यातल्या त्यात नगरी बोलीभाषा दिल्लीत कुणालाच कळत नव्हती. आता करायचं काय? तेवढ्यात त्यापैकी एका महिलेला अचानक आपल्या तालुक्यातील एका भूमिपुत्राची आठवण झाली… नाव होतं, नितीन वैद्य. नितीन वैद्य हे पत्रकार होते. परंतु ते आता दिल्लीत पत्रकारीता करतात, हे एका महिलेला माहित होतं. त्या महिलेने पोलिसांशी व त्यांच्याकडून वैद्य यांच्याशी कसाबसा संपर्क साधला. नितीन वैद्य यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. त्यांना समजलं की स्थानिक पोलिसांच्या भरवशावर राहिलो, तर सकाळपर्यंत काहीही होऊ शकतं आणि ही बातमी जर महाराष्ट्रात पोहोचली, तर संगमनेर आणि नगर जिल्ह्यातील ५२ कुटुंबांमध्ये भिती पसरेल. आता करायचं काय? तेवढ्यात नितीन वैद्य यांच्यापुढं एक नाव आलं.

नाव होतं, ज्येष्ठ नेते शरद पवार. ही घटना घडली तेव्हा शरद पवारही नेमकेच दिल्लीत होते. काही राजकीय कामानिमित्त ते दिल्लीत आले होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील इतरही काही नेते होते. मध्यरात्रीची वेळ होती. साधारण दीड-दोन वाजले असावेत. नितीन वैद्य यांनी धाडस करून या नेत्यांना फोन लावण्याचा निर्णय घेतला. वैद्य पत्रकार असल्यानं त्यांच्याकडे सगळ्या नेत्यांच्या निवासस्थानाचे लॅण्डलाईन नंबर होते. परंतु एवढ्या रात्री त्यापैकी फक्त शरद पवारांनीच फोन उचलला. नितीन वैद्य यांनी एका दमात घडलेला सर्व प्रकार पवारांना सांगितला. एकही प्रश्न न विचारता, किंवा “रात्रीचा कशाला त्रास दिला” असं न म्हणता, पवारांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले— “तुम्ही काळजी करू नका, मी बघतो.”

शरद पवारांची प्रशासनावरील पकड कशी होती, याचा प्रत्यय पुढच्या काही मिनिटांतच आला. १९९६ मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते, पण दिल्लीच्या राजकारणात त्यांचा दबदबा कायम होता. त्यांनी मध्यरात्रीच दिल्लीचे तत्कालीन पोलीस आयुक्त निखिल कुमार यांना फोन लावला. घडलेला प्रकार सांगितला. पवारांचा फोन येताच दिल्ली पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. संपूर्ण दिल्लीच्या सीमांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला. दिल्लीतून बाहेर जाणाऱ्या सर्व महामार्गांवर, टोल नाक्यांवर आणि चेकपोस्टवर तात्काळ नाकाबंदी करण्यात आली. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांना वायरलेसवरून त्या बसचा नंबर आणि वर्णन पाठवण्यात आले. अगदी पहाटे गरज पडली तर हेलिकॉप्टरने बसचा शोध घेण्याचीही तयारी सुरू झाली. दरम्यान, इकडे निजामुद्दीन पोलीस ठाण्यात नितीन वैद्य आणि कार्यकर्ते जीव मुठीत धरून बसले होते. पवारांनी स्वतः पहाटेपर्यंत या सर्च ऑपरेशनचा आढावा घेतला.

सकाळचे साधारणः सहा-सात वाजले असतील. संपूर्ण पोलीस यंत्रणा ज्या बसचा शोध जीवाच्या आकांताने घेत होती, त्या बसचा पत्ता अखेर लागला. आणि ती बस कुठे सापडली असेल, याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. ती बस दिल्लीत नव्हतीच… ती बस थेट उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पोहोचली होती!

झालं असं होतं की, दिल्ली दर्शन करत असताना त्या चौथ्या बसमधील संगमनेर आणि नगरच्या महिलांच्या मनात विचार आला— “आता आपण दिल्लीपर्यंत आलोच आहोत, तर इथून जवळच असलेलं हरिद्वार आणि गंगा दर्शन का करू नये?” त्या महिलांनी आपापसात चर्चा केली, बस ड्रायव्हरला तयार केलं आणि कोणालाही न सांगता, कुणालाही कल्पना न देता परस्पर बस थेट हरिद्वारच्या दिशेने वळवली! रात्रभर प्रवास करून या सर्व ५२ महिला पहाटे हरिद्वारला पोहोचल्या होत्या. आणि तिथे आरामात गंगास्नान आणि देवदर्शनाचा आनंद घेत होत्या. त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्यामागे दिल्लीत किती मोठं वादळ उठलंय. खुद्द शरद पवार पहाटे निजामुद्दीन पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी नितीन वैद्य यांना ही बातमी सांगितली की, “तुमच्या महिला सुखरूप आहेत, त्या परस्पर हरिद्वारला देवदर्शनाला गेल्या आहेत.” हे ऐकल्यानंतर पोलीस अधिकारी, स्वतः शरद पवार आणि नितीन वैद्य या सगळ्यांचीच अशी अवस्था झाली की हसावं की रडावं हेच कळेना!

ज्या महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलीस रात्रभर जागले, सीमा सील केल्या गेल्या, त्या महिला चक्क देवदर्शनाला गेल्या होत्या. तेव्हा शरद पवारांनी नितीन वैद्य यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना केली. ते म्हणाले— “नितीन, ही बातमी कुठेही छापून येऊ देऊ नकोस!” यामागचं कारणही तितकंच संवेदनशील होतं. जर ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली असती, तर त्या भोळ्याभाबड्या ग्रामीण महिलांची नाचक्की झाली असती. त्यांच्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप झाला असता आणि सरकारी यंत्रणेचीही उगाचच फजिती झाली असती. पवारांच्या या शब्दाचा मान ठेवत नितीन वैद्य यांनी तेव्हा ही बातमी कुठेच प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे एका वर्तमानपत्राच्या फक्त एका छोट्याशा चौकटीपलीकडे या घटनेची कुठेच चर्चा झाली नाही.

पुढे अनेक वर्षांनी, शरद पवारांच्या राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीवर आधारित एका पुस्तकात स्वतः पत्रकार नितीन वैद्य यांनी हा भन्नाट किस्सा लिहिला आणि तेव्हा कुठे १९९६ च्या त्या थरारक रात्रीचं रहस्य जगासमोर आलं. पुढे अनेक ब्लाँगमध्ये किंवा यूट्यूब चॅनल्सने यावर बातम्या केल्या. हा किस्सा आता छोटा वाटतोय, पण १९९६ साली तो घडल्यानं तो तेवढा वजनदारही आहे. मित्रांनो, तुम्हाला १९९६ चा हा किस्सा कसा वाटला? आजच्या सोशल मीडियाच्या युगात अशी घटना घडली असती तर काय झालं असतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अनोख्या ऐतिहासिक व राजकीय किस्स्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button