Explained

देवाला निमंत्रण देणारं महाराष्ट्रातील एकमेव गाव! इथे खुद्द खंडेराया ‘जावई’ म्हणून मुक्कामाला येतात

मित्रांनो, आपण आपल्या नातेवाईकांना लग्नाचं, सणाचं किंवा जेवणाचं निमंत्रण देण्यासाठी पत्रिका घेऊन त्यांच्या घरी जातो. आपल्या माणसांना किंवा आप्तेष्टांना निमंत्रण देण्याची ही प्रथा आहे. पण महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जेथील ग्रामस्थ साक्षात देवाला निमंत्रण देण्यासाठी जातात. आता तुम्ही म्हणाल काहीही पुड्या काय सोडताय..? असं कुठं असतं का..? थेट देवाला पत्रिका देऊन आमंत्रण…पण हे खरंय… हे कोणतंही काल्पनिक कथानक नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा बुद्रुक गावातील ग्रामस्थ, दरवर्षी थेट जेजुरीच्या खंडेरायाला आमंत्रण द्यायला जातात. धोंड्याला तर, थेट पत्रिका घेऊन जेजुरी गडावर निमंत्रणाचा कार्यक्रम असतो.

आता तुम्ही पुन्हा बुचकळ्यात पडाल… धोंडा तर जावयाचा सण… मग, जेजुरीच्या खंडेरायाला निमंत्रण का? तर देवाचं हेच नातंगोतं, हीच प्रथा, हीच लोककथा आणि हाच सगळा प्रकार आम्ही आज उलगडून सांगणार आहोत.

मित्रांनो, कोणत्याही परंपरेमागे एक खोल भावना दडलेली असते. नेवासा बुद्रुकचे लोक जेजुरी गडावर निमंत्रण घेऊन का जातात, हे समजून घेण्यासाठी आपल्याला या गावाचा इतिहास आणि पुराणकथा पाहाव्या लागतील.

प्रवरा नदीच्या तीरावर वसलेलं नेवासा हे शहर संत ज्ञानेश्वरांच्या पैस खांबासाठी जगप्रसिद्ध आहे. पण पौराणिक ग्रंथांमध्ये आणि लोकपरंपरेत या भूमीला ‘म्हाळसापुरी’ म्हणूनही ओळखलं जातं. श्रीमद्भागवत महापुराण आणि ‘मल्हारी माहात्म्य’ या ग्रंथांनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी जे ‘मोहिनी’ रूप धारण केलं होतं, ते पाहून महादेव भुलले होते. त्यांनी विष्णूंना, याच मोहिनी अवतारात आपली पत्नी होण्याची गळ घातली.

पुढे कलियुगात मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी जेव्हा महादेवांनी ‘मार्तंड भैरव’ अर्थात खंडेरायांचा अवतार घेतला, तेव्हा विष्णूंच्या त्या मोहिनी रूपाने पृथ्वीवर नेवासा बुद्रुक येथील व्यापारी तिम्माशेठ वाणी यांच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला. तिचंच नाव ‘म्हाळसा’ ठेवण्यात आलं. हीच म्हाळसा खंडेरायाची पत्नी झाली. त्यामुळे जेजुरीच्या खंडेरायाचं सासर हे नेवासा बुद्रुक झालं.

याच नेवासा गावाबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. प्रवरा नदीमुळे नेवासा गावाचे दोन भाग पडले :

नदीच्या एका तीरावर नेवासा खुर्द येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैस खांब आणि पेशवे काळात होळकरांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी बांधलेलं कलात्मक ‘मोहिनीराज मंदिर’ आहे. याच मोहिनीराज मंदीराच्या परिसरात मोहिनी अवतार झाल्याची कथा आहे.

तर नदीच्या पलीकडच्या तीरावर नेवासा बुद्रुक गावात, जिथे पूर्वी तिम्माशेठ वाणी यांचा ४० खणांचा भव्य वाडा होता, नेमक्या त्याच पवित्र जागेवर आज श्री खंडेराव, म्हाळसा आणि बाणाई यांचं प्राचीन ग्रामदैवत मंदिर उभं आहे. या मंदिराच्या आवारात जुनी दगडी दीपमाळ, प्राचीन शिवमंदिर आणि शिव-पार्वतीची दुर्मिळ मुर्तीही पाहायला मिळते. भारतीय पुरातत्त्व विभागाने या परिसरात केलेल्या उत्खननातून या भूमीचं प्राचीनत्व आजही अधोरेखित होतं.

पौष पौर्णिमेच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील पाली येथे म्हाळसादेवी आणि खंडेरायांचा विवाह पार पडला. लग्नानंतर म्हाळसादेवी सासरी गेल्या. पण नेवासा बुद्रुकच्या ग्रामस्थांसाठी त्या कायम आपल्या घरची लेक राहिल्या आणि जेजुरीचे खंडेराया या गावचे लाडके जावई बनले. आपल्या महाराष्ट्रात दर तीन वर्षांनी जेव्हा अधिक मास अर्थात ‘धोंड्याचा महिना’ येतो, तेव्हा प्रत्येक माहेरच्या घराला लेक-जावयाची ओढ लागते. मग नेवासा बुद्रुकचे ग्रामस्थ तरी आपल्या लाडक्या म्हाळसादेवी आणि जावई खंडेरायांना कसे विसरतील? अधिक मास सुरू झाला की, नेवासा बुद्रुक येथील म्हाळसादेवी मंदिराचे पुजारी, मानकरी आणि ग्रामस्थ आपल्या लेक-जावयाला धोंड्याच्या जेवणाचं प्रत्यक्ष निमंत्रण देण्यासाठी नेवाशातून थेट जेजुरी गडावर रवाना होतात. या निमंत्रण यात्रेतील प्रत्येक गोष्ट एखाद्या घरगुती सोहळ्यासारखी असते.

दर तीन वर्षांनी अधिक मासात जावई खंडेरायांना निमंत्रण देण्याची ही प्रथा तर अद्भुत आहेच; पण नेवासा बुद्रुकच्या जावयांना मात्र मानपानासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागत नाही. कारण या गावात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीला एक अनोखा सोहळा पार पडतो. चंपाषष्ठीच्या सात दिवस आधी मंदिरात घटस्थापना होते. या सात दिवसांत खंडेराय जेजुरी गडावर न राहता आपल्या सासुरवाडीला – नेवासा बुद्रुकला मुक्कामाला येतात, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. चंपाषष्ठीचं पारणं झाल्यानंतर आठव्या दिवशी ते पुन्हा जेजुरीला प्रस्थान करतात. या उत्सवासाठी गावातील तरुण पायी जेजुरी गडावर जातात आणि तिथून खंडेरायाची पवित्र ज्योत घेऊन नेवासा बुद्रुकला परत येतात.

ज्या गावात खुद्द देव दरवर्षी जावई बनून ८ दिवस राहतो, तिथे गावातील जावयांचा सन्मानही तितकाच मोठा असतो. चंपाषष्ठीच्या उत्सवात गावातील सर्व जावयांची नावं एका वहीवर लिहिली जातात. त्या नावांमधून एका जावयाची प्रातिनिधिक स्वरूपात निवड केली जाते. निवड झालेल्या त्या जावयाला साक्षात खंडोबाचं प्रतीक मानून त्यांची विधिवत पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर त्या लेक आणि जावयाला मानाचा ‘पाची पोशाख’ देऊन सन्मानाने त्यांची पाठवणी केली जाते. या दिवशी खंडेरायाला कांद्याच्या पातीचे वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि उत्सवासाठी जमलेल्या हजारो भाविकांना भरीत-रोडग्यांचा महाप्रसाद वाटला जातो.

नेवासा बुद्रुकच्या या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर एक अत्यंत वेगळं आणि शांत रूप पाहायला मिळतं. इतर मंदिरांप्रमाणे येथे मूर्ती उभ्या नसून, मध्ये खंडेराय, उजव्या बाजूला म्हाळसा आणि डाव्या बाजूला बाणाई अशा तिघांच्या पंगतीला जेवायला बसलेल्या बैठ्या मूर्ती आहेत. या बैठ्या मूर्तींमागे नात्यांमधील समजूतदारपणाची एक सुंदर लोककथा सांगितली जाते. खंडेरायांनी जेव्हा बाणाईशी विवाह केला, तेव्हा म्हाळसादेवी रुसून आपल्या माहेरी म्हणजेच नेवासा बुद्रुकला निघून आल्या. त्यांची समजूत काढण्यासाठी खंडेराय आणि स्वतः बाणाई नेवाशात आले.

सुरुवातीला सवतीच्या नात्याने म्हाळसादेवींनी बाणाईचा स्वीकार करण्यास नकार दिला. तेव्हा म्हाळसादेवींचे वडील तिम्माशेठ यांनी अत्यंत शांतपणे आणि प्रेमाने लेकीची समजूत घातली. ते म्हणाले, “बाणाईने खंडेरायांशी विधिवत विवाह केला आहे, त्यामुळे ती आता तुझी सवत नसून माझी दुसरी मुलगी आणि तुझी बहीण आहे.” वडिलांचे हे शब्द ऐकून म्हाळसादेवींचा रुसवा निवळला. त्यांनी बाणाईला आपलंसं केलं आणि तिघांनी एकत्र पंगतीला बसून भोजन केलं. कौटुंबिक एकोप्याचा हाच संदेश देणाऱ्या त्या बैठ्या मूर्ती आजही भक्तांना प्रेरणा देतात.

मित्रांनो, देवाला केवळ देव्हाऱ्यात न ठेवता, त्याला आपल्या घरातील जावई मानून त्याचं आदरातिथ्य करणं आणि अधिक मासात त्याला धोंड्याचं निमंत्रण द्यायला जेजुरीला जाणं—ही भावनाच किती निर्मळ आणि सुंदर आहे! नेवासा बुद्रुकसारखं गाव शेकडो वर्षांपासून आपल्या या परंपरेतून लेकीबद्दलचा आदर आणि नात्यांमधील गोडवा जपत आलं आहे. तुम्ही जर कधी अहिल्यानगर जिल्ह्यात किंवा नेवासा येथे गेलात, तर संत ज्ञानेश्वरांच्या पैस खांबासोबतच, नेवासा बुद्रुक येथील या शांत आणि पवित्र म्हाळसा-खंडेराव मंदिराचं दर्शन घ्यायला नक्की जा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button