Explained

दिवेआगर मंदीर दरोडा : दीड किलो सोन्याचा गणपती चोरला, वितळवून नगरच्या मातीत पुरला! एका ‘अंधश्रद्धेने’ चोर कसे अडकले?

काही पापं अशी असतात… ज्यांना देवही माफ करत नाही आणि निसर्गही ती विसरत नाही..

कल्पना करा… ज्या सुवर्ण गणपती बाप्पाच्या चरणी लाखो लोक डोकं टेकवतात, ज्या मूर्तीला एक हजार वर्षांचा इतिहास होता… त्या बाप्पाला एका दरोडेखोर टोळीनं चोरलं. मुर्ती कुणाला समजू नये म्हणून, या बाप्पाला धगधगत्या भट्टीत टाकलं आणि वितळवून त्याचा सोन्याचा गोळा बनवला… आणि तो गोळा कोकणापासून तीनशे किलोमीटर लांब, आपल्याच अहिल्यानगरच्या काळ्या मातीत जमिनीखाली पुरुन ठेवला…

ही कोणती काल्पनिक गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे, २४ मार्च २०१२ च्या त्या काळरात्रीची! कोकणातील दिवेआगरच्या सुवर्ण गणेश मंदीरातून दरोडेखोरांनी १ किलो ३०० ग्रॅमचा सोन्याचा बाप्पा चोरला होता. मंदिराचं रक्षण करणाऱ्या दोन पहारेकऱ्यांचे मुडदे पाडले होते. देवाच्याच मंदीरात एवढा भयानक दरोडा आत्तापर्यंत महाराष्ट्रात पडला नव्हता. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता. एवढंच नाही तर, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटीलांचीही कोंडी झाली होती. पण त्या रात्री दरोडेखोरांनी एक ‘क्ल्यू’ मागे ठेवला… आणि चोरीच्या घटनेनंतर महिनाभरात पोलिस थेट अहिल्यानगर तालुक्यातल्या ‘घोसपुरी’ गावापर्यंत पोहोचले!

पण, ही अट्टल टोळीही साधी नव्हती. पोलिसांची थर्ड डिग्री ज्यांना बोलतं करू शकली नव्हती. ६ तास मार खाऊनही पकडलेल्या दरोडेखोरांनी तोंड उघडलं नव्हतं… अखेर या टोळीप्रमुखाला पोलिसांनी त्यांच्याच ‘विटाळाच्या’ एका अंधश्रद्धेनं गुडघ्यावर आणलं, आणि चोरीची कबूली करुन घेतली. महाराष्ट्राला हादवणारी ही घटना तुम्हाला नक्कीच स्तब्ध करुन सोडेल. नगरची ती कुख्यात टोळी कोणती होती? या टोळीनं काय पराक्रम केला होता? पोलिसांनी या टोळीचा कसा छडा लावला? या टोळीत सोनारही कसे सहभागी होते?

या कथेची सुरुवात होते कोकणातील दिवेआगर या चिमुकल्या गावातून. १७ नोव्हेंबर १९९७ चा दिवस. एका नारळाच्या बागेत कुदळीने खड्डा खणण्याचं काम सुरू होतं. अचानक कुदळीला काहीतरी वाजलं. माती बाजूला सारली, तर आत एक जुनी तांब्याची पेटी होती. जेव्हा ती पेटी उघडली गेली, तेव्हा तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाचे डोळे दिपून गेले. त्या पेटीत साक्षात विघ्नहर्ता होता! तब्बल १ किलो ३०० ग्रॅम शुद्ध २४ कॅरेट सोन्याचा, हजार वर्षे जुना बाप्पाचा मुखवटा! इतकं सोनं पाहून कोणाचीही नियत फिरली असती. पण कोकणातल्या त्या साध्या माणसांनी एका पैशालाही हात लावला नाही. गावाने एकत्र येऊन मंदिर बांधलं आणि बाप्पाला तिथे बसवलं. बघता बघता दिवेआगरचा हा सुवर्ण गणेश अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत बनला. पण म्हणतात ना… जिथे देव असतो, तिथेच कुठेतरी दानवाची नजर पडलेली असते!

या बाप्पाावर नजर पडली, नगर जिल्ह्यातील एका कुख्यात टोळीची. त्यांनी कोकणात जाऊन मंदिराची रेकी केली. २३ मार्च २०१२ ची रात्र. दिवेआगर गाव शांत झोपलं होतं. मंदिराच्या दारात अनंत भगत आणि बबन घडशी हे दोन पहारेकरी रात्रभर जागून बाप्पाचा पहारा देत होते. मध्यरात्री दरोडेखोर मंदिराच्या छतावर चढले. कौलं बाजूला सारून ते दोरीने थेट गाभाऱ्यात उतरले. आवाज झाला, तसं दोन्ही पहारेकरी आत धावले. समोर पाच-सहा धिप्पाड दरोडेखोर, हातात लोखंडी पहारी आणि धारदार शस्त्रं!

त्या निशस्त्र पहारेकऱ्यांनी बाप्पासाठी आपला जीव पणाला लावला. दरोडेखोरांनी अक्षरशः निर्दयीपणे त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी घाव घातले. बाप्पाच्या गाभाऱ्यासमोरच त्या दोघांचे प्राण गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या रक्षकांच्या अंगावरून पाऊल टाकत दरोडेखोरांनी तिजोरी फोडली, बाप्पाचा मुखवटा उचलला आणि रात्रीच्या काळोखात गायब झाले.

सकाळी जेव्हा गावकऱ्यांनी मंदिराचं दार उघडलं, तेव्हा गाभाऱ्यात बाप्पा नव्हता… तिथे फक्त रक्त होतं! ही बातमी वाऱ्यासारखी अख्ख्या महाराष्ट्रात पसरली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर चोरीचा तपास लावण्यासाठी दबाव वाढला. आठ दिवस उलटले, पंधरा दिवस उलटले पण पोलिस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नव्हते. अखेर सरकारवर चौफेर टीका सुरू झाली. रायगड पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत होते. अखेर हा तपास पुणे गुन्हे शाखेकडे सोपवला गेला. निरीक्षक सुनील पवार आणि सुनील तांबे यांच्या टीमने विडा उचलला— जोपर्यंत बाप्पाला परत आणत नाही, तोपर्यंत शांत बसायचं नाही!

दरोडेखोरांना वाटलं होतं की आपण सह्याद्री ओलांडून नगरला आलो आहोत, आता कोकणचे पोलीस आपल्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत. पण नियतीचे खेळ वेगळे असतात! पुणे पोलिसांनी २४ मार्चच्या रात्री दिवेआगरच्या मोबाईल टॉवरवर आलेले लाखो कॉल्स तपासायला सुरुवात केली. त्यातले काही नंबर रात्री दिवेआगरला होते, पहाटे ताम्हिणी घाटात आले आणि दुपारी थेट अहिल्यानगर तालुक्यातील ‘घोसपुरी’ गावात येऊन बंद झाले!

तिकडे मंदिरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याने एका चोराचा चेहरा टिपला होता. त्या एका फोटोवरुन महाराष्ट्रातले सगळे कुख्यात दरोडेखोर तपासले गेले. अखेर पुण्यातीलच एका खबऱ्यांनी तो फोटो पाहिला आणि नाव सांगितलं— घोसपुरीचा कैलास भोसले! दरोडा पडून बरोबर एक महिना उलटला होता. २४ एप्रिलच्या मध्यरात्री पुणे पोलिसांच्या गाड्या अंधारात नगरच्या दिशेने निघाल्या. घोसपुरी गावाला वेढा पडला आणि कैलास भोसले व त्याचा साथीदार छोटू काळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

आरोपी हातात आले होते, पण बाप्पा कुठे होता? पोलिसांनी कैलास भोसलेला तब्बल ६ तास झोडपून काढलं. पण तो दगडासारखा शांत होता. एक शब्दही बोलायला तयार नव्हता. पोलिसांना कळून चुकलं होतं की, याच्या अंगावरचे वळ वाढतील, पण याचं तोंड उघडणार नाही. तेव्हाच निरीक्षक सुनील पवार यांच्या डोक्यात एक भन्नाट शक्कल आली. त्यांनी या टोळीच्या समाजाचा आणि त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला होता. या लोकांमध्ये ‘विटाळ’ म्हणजेच मासिक पाळीची अत्यंत तीव्र अंधश्रद्धा होती. अंगावर विटाळ पडला तर देव कोपतो आणि सर्वनाश होतो, अशी त्यांची ठाम समजूत होती. पोलिसांनी कैलासच्याच नात्यातील एका बाईला तिथे आणलं आणि कैलासच्या डोळ्यांत डोळे घालून सांगितलं— ‘तू खरं सांगत नाहीस ना? आता या बाईला विटाळ आलाय, तिला तुला शिववायला लावतो!’

मित्रांनो, जो गुन्हेगार पोलिसांच्या काठीला घाबरला नाही, त्याच्या अंगाचा थरकाप उडाला! ती बाई जशी त्याच्या जवळ येऊ लागली, तसा कैलास ओरडला— ‘थांबा! मी सगळं खरं सांगतो!’

पोलिसांची ती युक्ती काम करून गेली. कैलास पोलिसांना घोसपुरीच्या माळरानावर घेऊन गेला. तिथे एका बाभळीच्या झाडाला ओळख म्हणून फडकं बांधलं होतं. पोलिसांनी तिथली माती उकरली… आणि आत जे दिसलं, ते पाहून तिथे उभ्या असलेल्या पोलिसांच्याही डोळ्यांत पाणी आलं. तिथं बाप्पाची मूर्ती नव्हती… तर होती सोन्याची लगड! श्रीगोंद्यातील दोन सोनारांच्या मदतीने त्यांनी तो हजार वर्षे जुना, मंदीरातला गणपती भट्टीत टाकून वितळवला होता. सोन्याच्या लोभापायी त्यांनी देवालाही आगीत जाळलं होतं! पोलिसांनी त्यानंतर टोळीतले पाच सदस्य, सोने वितविणारे दोन सोनार आणि या टोळीला मदत करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतलं. तब्बल १० ते १२ जण पोलिसांनी या गुन्ह्यात पकडले.

नवनाथ भोसले, कैलास भोसले, ज्ञानेश्वर भोसले हे सख्खे भाऊ तसेच छोट्या काळे आणि विजय काळे या पाच मुख्य नराधमांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आजही ते तुरुंगात आहेत. चोरीचा माल लपवणाऱ्या खैराबाई भोसले, कविता काळे आणि सुलभा काळे या तीन महिलांना १० वर्षांची सक्तमजुरी झाली. आणि पैशासाठी बाप्पाची मूर्ती वितळवणाऱ्या दोन सोनारांना ९ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. आणि सगळ्यात शेवटी… ज्या मातीतून तो सोन्याचा लगड बाहेर काढला होता, त्याच सोन्यातून २०२१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीने पुन्हा एकदा तसाच तेजस्वी सुवर्ण गणेश मुखवटा घडवण्यात आला! नऊ वर्षांनी जेव्हा बाप्पा पुन्हा दिवेआगरच्या गाभाऱ्यात विराजमान झाला, तेव्हा अख्ख्या दिवेआगारने दिवाळी साजरी केली!

मित्रांनो, नगर जिल्ह्याच्या मातीत अनेक रत्नं जन्माला आली, पण अशा काही नराधमांमुळे या जिल्ह्याला कलंकही लागला. मात्र सत्याचा विजय झाला आणि बाप्पा पुन्हा आपल्या भक्तांच्या भेटीला आला. ही सत्यघटना तुमच्या मनाला भिडली असेल, तर हा व्हिडिओ प्रत्येक गणेशभक्तापर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सत्यघटनेसोबत. तोपर्यंत नमस्कार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button