सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात, बळीराजाला आपल्या हक्काच्या ऊसदरासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय असावं? सध्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न अक्षरशः पेटला आहे. सोमवारी, २३ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी येत्या गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी सर्व साखर कारखानदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
इतकंच नाही, तर दर जाहीर होईपर्यंत ऊस तोडणी बंद ठेवण्याच्या सूचनाही कारखान्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे दर जाहीर न झाल्यास, येत्या २८ तारखेला म्हणजेच शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात साखर कारखान्यांकडे जाणारे रस्ते रोखण्याचा आणि रेलरोको आंदोलन करण्याचा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर अन्याय कसा होतोय? आणि २६ तारखेच्या बैठकीत काय होणार? याचा सविस्तर आढावा आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण घेणार आहोत.
नमस्कार. आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह २४. नगरी घडामोडींचं परफेक्ट अँनलिसीस…
या व्हिडीओत सगळ्यात आधी, आपण आकड्यांचं गणित समजून घेऊया. यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन सुमारे दीड महिना उलटून गेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण १८ साखर कारखाने आहेत. त्यातील केवळ ७ कारखान्यांनी प्रतिटन २,८०० ते ३,२०० रुपयांपर्यंत पहिली उचल जाहीर केली आहे, तर उर्वरित ११ कारखान्यांनी अद्याप दरच जाहीर केलेला नसल्याचे सांगितले जातेय. आता दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती बघा. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन ३,९०० ते ४,००० रुपये दर देण्याचं मान्य केलं आहे.
हंगाम संपल्यानंतरचे १०० रुपये आणि साखरेचे दर तेजीत राहिल्यास अतिरिक्त २०० रुपये, असा एकूण ४,२०० रुपयांपर्यंतचा दर तिथल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. याचा अर्थ असा की, कोल्हापूर-साताऱ्यातील शेतकऱ्यांच्या तुलनेत अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना प्रतिटन थेट ८०० ते १,००० रुपयांचा फटका बसत आहे. शेतीचा उत्पादन खर्च, खते, मजुरी आणि पाणीपट्टी सारखीच असताना आमच्याच उसाला कमी भाव का, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत. शेतकरी संघटनांची प्रमुख मागणी आहे की, जिल्ह्यातील कारखान्यांनी पहिली उचल किमान ३,७०० रुपये जाहीर करावी आणि एकूण दर ३,९०० ते ४,००० रुपये प्रतिटन द्यावा.
हा उद्रेक एका दिवसात झालेला नाही. गेल्या महिनाभरापासून अहिल्यानगर जिल्ह्यात या दरासाठी संघर्ष सुरू आहे. यापूर्वी राहुरी येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्गावर तब्बल १४ तास बेमुदत रास्तारोको आंदोलन केलं होतं. त्यावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित झालं होतं. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आणि शेतकरी प्रतिनिधींच्या दोन ते तीन वेळा बैठका झाल्या. मात्र, या सर्व बैठका निष्फळ ठरल्या.
कारखानदारांनी दर जाहीर करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. परिणामी, शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि २३ नोव्हेंबरला अहिल्यानगर शहरात शेतकऱ्यांचा महामोर्चा धडकला.
२३ नोव्हेंबरला झालेल्या या आक्रोश मोर्चात राजू शेट्टी यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे, खा. निलेश लंके यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक नेते आणि शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहाच्या पटांगणात झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील कारखानदारांवर आणि राजकीय नेत्यांवर सडकून टीका केली.
शेट्टी म्हणाले की, “जिल्हा बँकेच्या निवडणुका असतील किंवा सत्तेची गणितं जुळवायची असतील, तर सर्वपक्षीय नेते एकत्र येतात. पण शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्यासाठी हे कारखानदार एकत्र का येत नाहीत?” इतकंच नाही, तर शेट्टी यांनी साखर उताऱ्याबाबतही गंभीर आरोप केला आहे. जिल्ह्यातील सरासरी साखर उतारा ११ टक्क्यांपेक्षा जास्त असतानाही कारखानदार साखर उताऱ्याची चोरी करून शेतकरी आणि शासनाची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे आंदोलन सुरु असतानाच, शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का आणि साखर आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी सभास्थळी येऊन जिल्हाधिकाऱ्यांचं लेखी पत्र राजू शेट्टी यांना दिलं. या पत्रात तीन महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत :
१. गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होईल.
२. या बैठकीत अंतिम दर निश्चित होईपर्यंत, मंगळवार २४ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील ऊस तोडणी बंद ठेवण्याच्या सूचना कारखान्यांना देण्यात आल्या आहेत.
३. या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी सध्याचं धरणे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आहे.
पण खरी लढाई आता सुरू झाली आहे. २६ तारखेच्या बैठकीत कारखानदारांनी आडमुठी भूमिका घेतली आणि ३,७०० रुपये पहिली उचल देण्यास नकार दिला, तर २८ नोव्हेंबरपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे जाणारे सर्व रस्ते रोखले जातील आणि रेलरोको आंदोलन छेडलं जाईल, असा अंतिम इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष गुरुवारच्या म्हणजेच २६ नोव्हेंबरच्या बैठकीकडे लागलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मध्यस्थीनंतर साखर कारखानदार नमती भूमिका घेणार का? अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे चार हजार रुपयांचा दर मिळणार का? की जिल्ह्यात पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा भडका उडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाला प्रतिटन किती दर द्यायला हवा? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि जिल्ह्यातील प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार…





