
नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा परिसरात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात शेवगावमधील हरवणे हत्याकांड प्रकरणातील आरोपी रमेश छगन भोसले (वय ३५, रा. साईनाथ नगर, नेवासा) हा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांतील वादातून हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात रमेश भोसले याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, डोक्यालाही गंभीर मार लागल्याची माहिती आहे. त्याच्यावर नगरच्या सुरभि हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून रमेश भोसले याच्यावर दरोडा आणि खुनाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. हरवणे हत्याकांड प्रकरणामुळे त्याचे नाव चर्चेत आले होते. आता त्याच्यावरच गोळीबार झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.
गोळीबारामागील नेमके कारण काय, हल्लेखोर कोण होते आणि या घटनेचा जुन्या वादाशी काही संबंध आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा तपास आणि पोलिसांची अधिकृत भूमिका स्पष्ट झाल्यानंतर घटनेचे पुढील तपशील समोर येतील.





