
श्रीरामपुरात अमली पदार्थांच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका ३० वर्षीय तरुणासह दोन १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
श्रीरामपूर शहर पोलिसांना अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. जर्मन हॉस्पिटलच्या पाठीमागे, उपाध्ये मळा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत मयूर राजेंद्र वाघ, वय ३०, रा. निपाणी निमगाव, तसेच दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे ६० हजार रुपये किमतीचा ४ किलो गांजा आणि ५ लाख रुपये किमतीची किया सोनेट कार जप्त करण्यात आली.
जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ६० हजार रुपये आहे. या प्रकरणी अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांचा या व्यवहारासाठी वापर झाला का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.





