
राहाता तालुक्यातील केलवड गावच्या अक्षय या आदिवासी भिल्ल युवकाची कर्नाटकात अमानुष हत्या करण्यात आली असून यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. मंडळी, ड्रायव्हर म्हणून अक्षयला कर्नाटकात नेण्यात आलं.
तिथे जेवणातून विष देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर हात-पाय बांधून ट्रकला दोरीने बांधत त्याला काही किलोमीटर फरफटत नेल्याचा आरोप आहे. एवढ्यावर न थांबता धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर केलवडमध्ये संताप उसळला. गाव बंद ठेवत नागरिकांनी रस्ता रोको केला. आरोपींवर कठोर कारवाई, गुन्हा महाराष्ट्रात वर्ग करणे, फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणे आणि कुटुंबाला सरकारी मदत व पुनर्वसन देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अक्षयच्या पश्चात तीन मुलं आहेत. त्यामुळे या कुटुंबाला न्याय आणि आधार मिळणार का, हा मोठा सवाल आहे. नक्कीच ही घटना माणुसकीला हादरवून सोडणारी आहे !





