
अहिल्यानगर जिल्हा कारागृहाची क्षमता फक्त १०९ कैद्यांची.. पण सध्या याच कारागृहात तब्बल ३१५ कैदी बंदिस्त आहेत. म्हणजेच क्षमतेच्या जवळपास तीनपट कैद्यांचा भार या कारागृहावर आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, न्यायालयीन प्रक्रिया आणि प्रलंबित खटल्यांमुळे कारागृहातील कैद्यांची संख्या वाढत आहे. त्यात तालुकास्तरावरील अनेक कारागृहे बंद झाल्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींना जिल्हा कारागृहातच ठेवावे लागत आहे.
सध्या जिल्ह्यातील कारागृहाची क्षमता १०९ कैद्यांची असताना तब्बल ३१५ कैदी येथे आहेत. त्यामुळे निवास, आरोग्य, सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. महिला कैद्यांसाठी तर अहिल्यानगर जिल्हा कारागृहात स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांची रवानगी थेट नाशिक कारागृहात केली जाते. दरम्यान, जिल्ह्यात चोरी, घरफोडी, दरोडा, चैनस्नॅचिंग आणि मारामारीसारख्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या कैद्यांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कारागृहावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.
मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होण्याची शक्यता आहे. नारायणडोह येथे जिल्ह्यासाठी नवीन कारागृह उभारण्याचे काम सुरू आहे. हे कारागृह पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या जिल्हा कारागृहावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.





