
अहिल्यानगर जिल्ह्यातून बालाजीला जाणाऱ्या भक्तांनी एक मोठी मागणी केली आहे. सध्या शिर्डीहून तिरुपतीला जाणाऱ्या सर्व गाड्या छत्रपती संभाजीनगर मार्गे जातात, ज्याला तब्बल २७ ते ३० तास लागतात. पण आता दौंड मार्गे नवीन सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे.
जर ही गाडी शिर्डी – बेलापूर – अहिल्यानगर – दौंड मार्गे धावली, तर हा प्रवास अवघ्या १७ ते १८ तासांत पूर्ण होईल. म्हणजेच भाविकांचे थेट १० ते १२ तास वाचणार आहेत. नेवासा येथील बालाजीभक्त शंकर नाबदे यांनी यासाठी थेट रेल्वेमंत्र्यापर्यंत पाठपुरावा सुरु केला आहे.
दौंड जंक्शन येथे देखभाल आणि पिट लाईनची पूर्ण सुविधा असल्याने ही गाडी सुरू करणे सहज शक्य आहे. यामुळे रेल्वेचा महसूल वाढेल आणि लाखो भाविकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचेल, असे नाबदे यांचे म्हणणे आहे.
असे झाल्यास शिर्डीसह शनिशिंगणापूर येथे आंध्रप्रदेशातून येणाऱ्या भाविकांचीही सोय होणार आहे. लाखो भाविकांच्या सोयीसाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने पाठपुरावा करावा, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





