
एका एकराच्या शेततळ्यात साठवलं तब्बल १ कोटी ३० लाख लिटर पाणी… आणि त्याच पाण्याच्या काटेकोर नियोजनातून खानापूरचे प्रयोगशील शेतकरी आप्पासाहेब रहाटळ यांनी २० एकरांची फळबाग फुलवली.
रहाटळ यांच्या शेतात ८ एकरांवर भगव्या डाळिंबाची, तर १२ एकरांवर द्राक्षांची बाग आहे. सध्या डाळिंब काढणीला वेग आला असून, लालभडक डाळिंबे प्रतवारी आणि पॅकिंगनंतर थेट दिल्लीच्या बाजारपेठेत पाठवली जात आहेत.
२०२३ मध्ये लावलेल्या साडेतीन हजार रोपांनी अवघ्या दुसऱ्याच वर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवून दिले. अनेक डाळिंबांचे वजन ६०० ते ७०० ग्रॅमपर्यंत आहे.
एका झाडाला सरासरी ३० ते ४० फळे लागली असून, व्यापाऱ्याने १११ रुपये किलोचा दर दिला आहे. विशेष म्हणजे, शेतात विहीर किंवा बोअरवेल नसतानाही जायकवाडीच्या बँकवॉटरमधून पाइपलाइनद्वारे पाणी आणून हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.





