
अहिल्यानगरच्या केडगाव परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मित्रांकडून होत असलेल्या कथित शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून २२ वर्षीय गणेश शंकर धोत्रे याने आत्महत्या केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशची शुभम घोडेकर आणि विराज गिरवले यांच्याशी मैत्री होती. मात्र, दोघांकडून त्याला वारंवार मारहाण आणि त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेच्या आदल्या दिवशी, म्हणजे ८ सप्टेंबर रोजीदेखील गणेशला त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या त्रासामुळे आणि अपमानामुळे गणेशने ९ सप्टेंबर रोजी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बीएनएस कलम १०७ आणि ३(५) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.





