
अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. जिल्ह्यात सध्या चारा टंचाई नसली, तरी उपलब्ध चारा केवळ चार महिने पुरेल, अशी स्थिती आहे. गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चारा आणि पाणी व्यवस्थेचा आढावा घेतला. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास चारा डेपोची मागणी होऊ शकते.
मात्र, डेपोमधील गैरव्यवहाराच्या तक्रारी लक्षात घेता, थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे मदत देण्याचा पर्याय तपासला जात आहे. जवळच्या शेतकऱ्यांकडूनच चारा उपलब्ध करून देण्याच्या नियोजनावरही विचार सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील १०५ गावांना १०८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २१ जलस्रोतांवर फिल्टर प्लांट उभारण्यासाठी साडेचार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पिकांच्या नुकसानीचा आढावाही प्रशासन घेणार आहे.





