
शेवगाव शहरातील शिवनगर आणि नेहरूनगर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली. १४ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.
गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष बनावट ग्राहक पाठवून संबंधित ठिकाणी प्रकार सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एकूण आठ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
निर्मला कदम हिच्यावरील कारवाईतून तीन, शबाना सय्यद हिच्यावरील कारवाईतून तीन, तर अभिनव अंधारे याच्यावरील कारवाईतून दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.





