
श्रीगोंद्यात जुन्या वादाचा राग पुन्हा पेटला… भरदुपारी गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली! पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील गव्हाणवाडी येथे रविवारी दुपारी धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. म्हसे खुर्द येथील प्रशांत वाबळे, मयूर मदगे आणि हर्षल जाधव हे तिघे दुचाकीवरून शिरूरला गणपती आणण्यासाठी निघाले होते.
दुचाकीचे पेट्रोल संपल्याने ते माघारी फिरले. गव्हाणवाडीतील नायरा पेट्रोल पंपाजवळ पोहोचताच कारमधून आलेल्या सहा जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलातून तीन राऊंड फायर केल्याचा आरोप आहे. तसेच कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
प्रसंगावधान राखत तिघांनी वेळीच आडोसा घेतल्याने त्यांचा जीव वाचला. या प्रकरणी बेलवंडी पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत. घटनास्थळी एक काडतूस सापडले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.





