
अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील अस्तगावमध्ये उपचाराच्या बहाण्याने एका २१ वर्षीय महिलेवर आणि तिच्या भावावर धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आजारपणामुळे त्रस्त असलेल्या महिलेला एका व्यक्तीच्या प्रार्थनेने तब्येत सुधारेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने महिलेला फोन करून प्रार्थना आणि मंत्रोच्चार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
१६ सप्टेंबरला तो व्यक्ती महिलेच्या माहेरी पोहोचला. घरात प्रार्थना सुरू केल्यानंतर तिच्या भावाच्या हातातील धागा तोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. तसेच करणीबाधा दूर करण्यासाठी धर्मांतर करावे लागेल, असा दबाव टाकल्याचे सांगण्यात आले.
घरातील प्रकारामुळे शेजारी जमा झाले. त्यानंतर संशय निर्माण झाल्याने पोलिसांच्या मदतीने महिलेला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या प्रकरणी जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील पुढील सत्य समोर येणार आहे.





