
पारनेरमधील सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. ठेवीदारांना गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या ठेवी परत मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेने संस्थेच्या संचालकांच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले, उपाध्यक्ष अण्णा औटी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास झंजाड यांच्यासह संबंधित १२ जणांच्या मालमत्तांच्या हस्तांतरणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये जमिनी आणि घरांसह इतर मालमत्तांचा समावेश आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने पारनेरच्या दुय्यम निबंधकांना पत्र दिलं आहे.
या प्रकरणात संबंधित पदाधिकाऱ्यांसह १२ जणांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, सध्या संस्थेचं फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे.
दरम्यान, संस्थापक माजी आमदार विजय औटी यांच्यासह स्थापनेपासूनच्या संचालकांच्या मालमत्ताही सील करण्याची मागणी शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोद गोळे यांनी केली आहे.
आता फॉरेन्सिक ऑडिटमधून काय समोर येतं आणि ठेवीदारांचे पैसे कधी परत मिळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





