
तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये तुमच्या नकळत काही बदल झाला, तर? आता काळजी करण्याची गरज नाही.. कारण भूमी अभिलेख विभागाने जमीनधारकांसाठी एक महत्त्वाची डिजिटल सुविधा सुरू केली आहे.
शेतजमीन किंवा मालमत्तेच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळकावणे, मालकाच्या नकळत हक्क बदलणे किंवा फेरफार करण्याचे प्रकार वाढत असल्याने भूमी अभिलेख विभागाने ‘ई-संदेश’ ही एसएमएस अलर्ट सेवा सुरू केली आहे.
या सुविधेमुळे तुमच्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यात, फेरफार नोंदीत किंवा मालमत्ता पत्रकात कोणताही बदल झाला, नवीन नोंद झाली किंवा त्यासंदर्भात अर्ज दाखल झाला, तर त्याची माहिती थेट तुमच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे.
म्हणजेच, तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये तुमच्या नकळत काही हालचाल झाली, तरी तुम्हाला त्याची माहिती तात्काळ मिळू शकते.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना संबंधित पोर्टलवर जाऊन आपल्या मालमत्तेचा तपशील आणि मोबाइल क्रमांक नोंदवावा लागणार आहे. त्यानंतर जमिनीशी संबंधित व्यवहार किंवा नोंदीमध्ये बदल झाल्यास मोबाइलवर अलर्ट मिळणार आहे. मंडळी, ही महत्वपूर्ण माहिती प्रत्येक जमीनधारकापर्यंत पोहोचवा.





