नगरपालिका, महानगर पालिका निवडणुकीनंतर माजी खा. सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा शिर्डीतील गुन्हेगारीकडे लक्ष्य वळविले. शिर्डीतील एम्पाँईड सोसायटीच्या कार्यक्रमात, सोमवारी सुजय विखेंचा पुन्हा रुद्रावतार दिसला. डू नाँट डिस्टर्ब… शिर्डी व राहाता माझं कुटुंब आहे, त्या कुटुंबाला डिस्टर्ब करु नका, मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना चॅलेंज दिलं. जे दोरीत चालणार नाही, त्यांची हद्दपारी केली जाईल, असं थेट आव्हान त्यांनी दिलं. विखेंच्या याच वक्यव्याची सध्या चांगलीच चर्चा होतेय.
शिर्डीतील एम्पाँईड सोसायटीच्या एका कार्यक्रमानिमित्त 26 जानेवारीला माजी खा. डाँ. सुजय विखे पाटील शिर्डीत होते. या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणात पुन्हा एकदा शिर्डीतील गुन्हेगारीवर प्रहार केला. दोन दिवसांपूर्वी जेलमधून सुटलेल्या गुन्हेगाराची मिरवणूक काढण्याच्या मुद्याला त्यांनी पुन्हा एकदा हात घातला.
शिर्डीतील कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या प्रकाराला आता वर्ष उलटलंय. परंतु त्यानंतर आपण अशी एकही घटना शिर्डीत होऊ दिली नाही. आपण शिर्डीतील माता-भगिनींना जो शब्द दिला तो पाळला. शिर्डीतील पोलिस प्रशासनाचे त्यासाठी आभार मानावे लागतील. प्रश्न अनेक आहेत, पण ते आपण सोडवू. आपण शब्द पाळतो म्हणूनच शिर्डी व राहात्यात अभूतपुर्व यश मिळवलं.
ब्लॅकमेलिंगचं राजकारण झालं. पण ते जनतेनं उधळलं. शिर्डीतील गुन्हेगारी व अवैध व्यवसाय आपण साफ करणार आहोत. शिर्डीसाठी आपण काही नवे नियम आणणार आहोत. त्यात राजकारण नाही. शिर्डीला सुरक्षित ठेवण्यासाठी ते घ्यावे लागणार आहे. आपल्यावर अजून अनेक आरोप होणार आहेत, परंतु आपण चांगल्या कामासाठी हे आरोपही स्विकारु. आता आपल्याला शिर्डीकरांनी पूर्ण बहुमत दिलंय. राजकीय दुकानदारी समाजासाठी घातक होती, ती जनतेनं उधळून लावली.
पदासाठी स्पर्धा करु नका. मला खासदारकीला पराभूत केलं. परंतु मी थांबलो नाही. ज्या लोकांनी मला खासदारकीला नाकारलं, त्याच लोकांनी मला अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीत स्विकारलं. तेथे 68 पैकी 52 शिट मी निवडून आणले. जेव्हा एवढं मॅण्डेड मिळतं, ते स्वच्छता करण्यासाठी असतं. लोकांनी आपल्यावर जो विश्वास ठेवलाय तो आपण पूर्ण करणार. शिर्डीतील तीन अपक्षांनीही आपल्याला पाठींबा दिला. आता खऱ्या अर्थाने 23-0 झालंय. शिर्डीचं विश्वस्त मंडळही 3 महिन्यांत येईल, असे प्रयत्न आपण करणार आहोत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका झाल्यानंतर विश्वस्थ मंडळ द्यावं, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार आहोत.
मी सरळ मार्गाने चालणारा माणूस आहे. मला बोट लावू नका. शिर्डी व राहता हा माझा परिवार आहे. त्या परिवाराला त्रास देऊ नका. आम्हाला निवडून दिलंय. तर आम्हाला काम करु द्या. शिर्डीतील गुन्हेगारांविरोधात सगळ्यांनी एकजूट करा. फक्त दोन दिवस द्या, दोन दिवसांत येथील गुन्हेगारी समूळ नष्ट करु. जेवढे गुन्हेगार कार्यकर्ते असतील, तेवढे सगळे हद्दपार केले जातील, असा विश्वासही त्यांनी शिर्डीकरांना दिला.





