
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात सध्या एका अनोख्या बोकडाची चर्चा रंगली आहे. चिखलागड येथील सुरेश रंगराव राठोड यांच्या कुटुंबाकडे असलेल्या बोकडाच्या शरीरात दूध असल्याचे आढळून आले.
राठोड कुटुंबाकडे सुमारे २० लहान-मोठ्या शेळ्या आहेत. जवळपास दीड वर्षांपूर्वी त्यांच्या एका शेळीने या बोकडाला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वी कळपातील काही शेळ्या आजारी पडल्या होत्या. त्यांची तपासणी करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक विलास ओहेकर तिथे गेले होते. याच वेळी त्यांचे लक्ष या बोकडकडे गेले आणि त्याच्या शरीरात दूध असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ही घटना समोर आल्यानंतर परिसरातही या बोकडाची चर्चा सुरू झाली आहे. पशुधन पर्यवेक्षकांच्या मते, शरीरातील काही अवयव पूर्णपणे विकसित न होणे किंवा त्यामध्ये झालेल्या बदलांमुळे अशा प्रकारच्या घटना दिसून येऊ शकतात. नेमका हा प्रकार कसा घडला, याबाबत पशुवैद्यकीय तपासणीतून अधिक स्पष्ट माहिती मिळू शकते.





