
अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे जातपंचायतीच्या निर्णयावरून गंभीर प्रकार समोर आला आहे. नंदीवाले तिरमली जातीतील मुलीने तिच्याच जातीच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला तरी कुटुंबाला जातपंचायतीने दंड ठोठावल्याचा आरोप आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, सुया-फण्या विकून पालामध्ये राहून ते उदरनिर्वाह करतात. जातपंचायतीने एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यापैकी 50 हजार रुपये कर्ज काढून दिले, मात्र उर्वरित रक्कम न दिल्याने कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कुणीही त्यांच्याशी बोलू नये, सुख-दुःखाच्या प्रसंगी त्यांना सहभागी करून घेऊ नये, असे आदेश दिल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर कुटुंबातील सदस्याला भावाच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहता आले नसल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांसह पीडित कुटुंबाने कोपरगाव ग्रामीण पोलिसांकडे निवेदन दिले असून, पोलीस पुढील चौकशी करत आहेत.





