
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलिसांनी गणेश मंडळांना स्पष्ट इशारा दिला आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवल्यास संबंधित गणेश मंडळासह डीजे चालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
एवढंच नाही, तर नियमबाह्य डीजे जप्त करून कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी दिली.
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६९ गावांमधील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवण्याचे आवाहन करण्यात आले.
कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे भजन, कीर्तन, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
नियमबाह्य डीजे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.





