
विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे ! शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात राहण्याचा खर्च परवडत नाही आणि वसतिगृहातही प्रवेश मिळत नाही? मग आता चिंता करण्याचं कारण नाही! महाराष्ट्र सरकारने ‘स्वाधार’ योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना आता वार्षिक ६० हजारांऐवजी तब्बल ८० हजार रुपये मिळणार आहेत.
इतर महसूल विभागीय शहरांमध्ये ६८ हजार, जिल्ह्यांच्या ठिकाणी ५७ हजार, तर तालुक्याच्या ठिकाणी ५० हजार रुपये वार्षिक अनुदान दिलं जाणार आहे.
विशेष म्हणजे, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी दरवर्षी ८ हजार रुपये, तर इतर शाखांतील विद्यार्थ्यांना ४ हजार रुपये अतिरिक्त मिळतील.
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार देणं हा या योजनेचा उद्देश आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात समाजकल्याण विभागाची १८ शासकीय वसतिगृहं असून त्यांची प्रवेश क्षमता १,५१० आहे. वसतिगृहात जागा न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ योजनेचा लाभ घेता येतो.





