
ऑनलाइन ओळख करताना सावध रहा… कारण एका तरुणाला डेटिंग अॅपवरून मैत्री करणं चांगलचं महागात पडलय. मंडळी, अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
‘ग्राइंड्र’ अॅपच्या माध्यमातून तरुणाशी मैत्री करून त्याला केडगाव लिंक रोडवर भेटण्यासाठी बोलावण्यात आले. केडगाव लिंक रोडवर तरुण पोहोचताच तिघांनी त्याच्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर खिशातील ७ हजार ५०० रुपये रोख आणि फोन-पेद्वारे ५ हजार रुपये, असे एकूण १२ हजार ५०० रुपये जबरदस्तीने घेतल्याची तक्रार कोतवाली पोलिसांत दाखल झाली.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. मनोज भिंगारदिवे, सिद्धांत जगताप आणि सुमित गायकवाड या तिघांना पोलिसांनी अटक केली.
आरोपींकडून दुचाकी, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तींशी अशा अॅपवरून ओळख करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.





