
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीने महायुतीतील राजकीय गणितं तापली आहेत. १९५७ पासूनच्या इतिहासात थोरात, विखे, घुले, गडाख यांसारख्या घराण्यांचा प्रभाव राहिला. २०२३ मधील शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा अपवाद वगळता भाजपला बँकेवर थेट वर्चस्व मिळवता आलेलं नाही.
मात्र यावेळी परिस्थिती बदललेली दिसते. जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे चार-चार आमदार असले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत भाजपची ताकद वाढली आहे.
त्यातच आगामी निवडणूक अजित पवार यांच्या अनुपस्थितीत होत असल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाच्या वाटाघाटीच्या ताकदीवरही चर्चा सुरू आहे.
२१ जागांच्या बँकेत महायुतीकडून बिनविरोधाचा फॉर्म्युला चर्चेत आहे. संगमनेर आणि नेवासा वगळता इतर मतदारसंघांत महायुतीतीलच लढत होण्याची शक्यता आहे. मात्र खरी लढाई जागावाटपाची नाही… तर अध्यक्षपदाची! भाजप अध्यक्षपदावर दावा करणार का? राष्ट्रवादी तडजोड करणार का? यावर जिल्हा बँकेचं पुढचं राजकीय गणित ठरणार आहे.





