
५ ऑक्टोबरचा दिवस… वेळ दुपारची आणि पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर एकामागून एक फोन येऊ लागले. प्रत्येक फोनवरील तक्रार वेगळी होती. मात्र, या तक्रारींमागचं खरं कारण पोलिसांनाही सुरुवातीला समजलं नाही.
संगमनेरमधील देवगाव येथील धनंजय रामनाथ शिंदे या ३४ वर्षीय व्यक्तीने डायल ११२ वर तब्बल पाच वेळा फोन केला. सुरुवातीला जागेवर अतिक्रमण करून मारहाण होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर जबरदस्तीने विष पाजत असल्याचा आरोप केला. पुढे कुटुंबीयांनाही विष पाजत असल्याचं सांगितलं. एवढंच नाही, तर पोलिसांनीच मारहाण केल्याची तक्रारही केली.
या सततच्या फोनमुळे पोलिसांची धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी धनंजय शिंदे याला ताब्यात घेतलं. त्याच्या तोंडातून उग्र वास येत असल्याने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर तो अमली पदार्थांच्या अमलाखाली असल्याचा अभिप्राय देण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उल्हास बढे यांच्या फिर्यादीवरून धनंजय शिंदेविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





