
राज्यात यंदा मान्सूनच्या पावसाचं वितरण अत्यंत विषम राहिलं असून, २० सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा १७ टक्के पावसाची तूट नोंदली आहे. अहिल्यानगरमध्ये तब्बल ४५ टक्के पावसाची कमतरता आहे. मात्र, आता परतीच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि परतीच्या मान्सूनच्या हालचालींमुळे पुढील काही दिवस पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने २४ सप्टेंबरपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळला येलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, राज्यातील धरणसाठाही मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. मराठवाड्यातील १२९ प्रकल्पांमध्ये केवळ ४६.१९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. आता परतीचा पाऊस पावसाची तूट कितपत भरून काढतो, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.





