
अकोलेच्या ऊस रानात आता पीकतेय निर्यातक्षम केळी.. या प्रयोगातून शेतकऱ्यांनी शेतीत नवा प्रयोग उभा केलाय. अकोले तालुक्यातील आढळा खोऱ्यातील वीरगाव परिसरात शेतकऱ्यांनी केळीच्या निर्यातक्षम फळबागेचा अभिनव प्रयोग केलाय.
तब्बल ४५ एकर क्षेत्रावर सध्या केळीची बाग बहरली असून, या प्रयोगातून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
या प्रकल्पात ३४ शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. यामध्ये २७ एकर क्षेत्र शेडनेटमध्ये, तर १८ एकर क्षेत्रावर थेट सूर्यप्रकाशात केळीची लागवड करण्यात आली आहे.
आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील या भागात यापूर्वी डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले. त्यानंतर शेडनेटमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचा प्रयोग करण्यात आला. आता याच शेडनेटचा आधार घेत जळगावच्या धर्तीवर केळीची शेती करण्याचा प्रयोग सुरू झाला आहे.
दीड एकरच्या क्षेत्रात सुमारे बाराशे केळीची रोपे लावली जातात. एका रोपासाठी सुमारे १७ रुपये खर्च आला. मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना रोजगारही मिळाला आणि फळबाग लागवडीअंतर्गत रोपांची मदतही मिळाली.
केळीच्या लागवडीसाठी खते आणि औषधांसह साधारण ४० हजार रुपयांचा खर्च आला असून, आता एकरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.





