
अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ तालुक्यांसह राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दुष्काळ जाहीर होणे ही फक्त घोषणा नाही, तर या काळात नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीक कर्जाच्या पुनर्गठनाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्यात येणार आहे.
जमीन महसुलात सूट देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. शेतीपंपाच्या वीजबिलाबाबतही दिलासा देण्यात आला आहे. ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल आधीच माफ करण्यात आले आहे. आता त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपांनाही सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दुष्काळ जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही.शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत नियमांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक रोजगाराची कामे सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागात आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे.
पशुधनासाठी चार्याची व्यवस्था करण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. याशिवाय जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन सुरूच राहणार आहे.
म्हणजेच, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी कर्ज, वीज, पाणी, रोजगार, अन्नधान्य आणि चारा अशा विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्याची घोषणा करण्यात आली आहे.





