
राज्यात यंदा पावसाने दिलेली ओढ आणि अनेक भागांत निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेता अखेर सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागाला विविध सवलती व मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर प्रशासनाकडून उपलब्ध अहवाल आणि परिस्थितीचा आढावा घेत 265 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’ अंतर्गत दुष्काळ जाहीर करण्यात आला.
यामुळे राज्यातील सुमारे 75 टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत आले आहेत. या भागातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांसाठी विविध उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.
अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश आहे.
हे पण वाचा : दुष्काळ जाहीर होताच शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा! कर्ज, वीज, पाणी, चारा… जाणून घ्या काय मिळणार
ठाणे विभाग
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ, रायगडमधील पनवेल, कर्जत व पेण तसेच पालघरमधील डहाणू, तलासरी आणि विक्रमगड यांचा समावेश आहे.
पुणे विभाग
पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर, वेल्हे, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, करमाळा, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
नाशिक विभाग
नाशिकमधील इगतपुरी, मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, सिन्नर, येवला आणि देवळा यांसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश आहे.
कोल्हापूर विभाग
सातारा जिल्ह्यातील पाटण, खटाव, माण, फलटण आणि खंडाळा तसेच सांगलीतील मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि कोल्हापूरमधील चंदगड व राधानगरी या तालुक्यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर विभाग
छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, तसेच जालना आणि बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे.
लातूर विभाग
लातूरमधील रेनापूर, धाराशिवमधील धाराशिव, तुळजापूर, परांडा व भूम तसेच परभणीतील पाथरी आणि मानवत या तालुक्यांचा समावेश आहे.
अमरावती विभाग
बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतील विविध तालुक्यांना दुष्काळाचा फटका बसला असून, त्यांचाही या निर्णयात समावेश आहे.
नागपूर विभाग
वर्धा जिल्ह्यातील वर्धा व देवळी, गोंदियातील तिरोडा व सालेकसा तसेच गडचिरोलीतील कुरखेडा, धानोरा आणि एटापल्ली या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय मिळणार?
दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारकडून विविध सवलती आणि मदत उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.
- जमीन महसुलात सवलत मिळणार
- पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार
- शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
- कृषीपंपांच्या चालू वीजबिलात सवलत
- 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतच्या पंपांचे वीजबिल आधीच माफ असून, त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांनाही सवलत देण्यात येणार
- शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत
- रोजगार हमी योजनेत नियम शिथिल करून अधिक कामे उपलब्ध करून देण्याचे नियोजन
- गरज असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था
- दुष्काळग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीजजोडणी खंडित न करण्याचे निर्देश
- शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था
- जनावरांसाठी चारा छावण्या आणि चाऱ्याची व्यवस्था
- जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार
- पिण्याचे पाणी तसेच पशुधनासाठी पाण्याचे नियोजन सुरूच राहणार
- पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
- पिकांची प्रत्यक्ष स्थिती नोंदवण्यासाठी छायाचित्रे आणि GPS आधारित माहिती संकलित केली जाणार
दुष्काळ जाहीर झाल्याने आता या उपाययोजनांची अंमलबजावणी कशी होते आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





