
श्रीरामपूरमधील गंभीर प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. महिलेवर पिस्तुलाचा धाक दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या सागर बेगचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. 29 ऑगस्ट रोजी दिलेला अंतरिम जामीन आदेशही न्यायालयाने रद्द केला.
या प्रकरणाची सुरुवात शिर्डी पोलिसांकडे नोंदवलेल्या शून्य एफआयआरने झाली. त्यानंतर तपास श्रीरामपूर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. फिर्यादीनुसार, सहआरोपी बाबू साळवे याच्या खोलीत सागर बेग आणि सोनू बेग यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत महिलेला धमकावल्याचा आरोप आहे.
सरकारी पक्षाने गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल अद्याप जप्त झालेले नाही. तसेच आरोपीवर यापूर्वी 25 गुन्हे दाखल असून आरोपीला कोठडीत घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याचा युक्तिवाद केला.
खरेतर, महिलेने एफआयआरसाठी मानसिक दबाव असल्याचा दावा करत युटर्न घेतला होता. मात्र, एफआयआर नोंदवतानाचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध होते. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला.





