
महाराष्ट्राच्या लावणी आणि लोककलेच्या नावाखाली सुरू असलेल्या आक्षेपार्ह कार्यक्रमांवर आता शासनाची नजर राहणार आहे!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने अशा कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे ठोस कारवाईची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या नाटक, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग आणि मेळ्यांसारख्या कार्यक्रमांसाठी संबंधित संहिता, निवेदन किंवा कार्यक्रमाचा सारांश तपासणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे ‘Suitability Certificate’ घेणे बंधनकारक राहणार आहे. यामुळे लावणी आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेच्या नावाखाली होणाऱ्या अश्लील व आक्षेपार्ह सादरीकरणांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.
लोककलेची परंपरा जपतानाच तिची सांस्कृतिक प्रतिष्ठा आणि सामाजिक मर्यादा टिकवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.





