
तुमच्या मुलाला नर्सरी किंवा पहिलीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र सरकारने शाळाप्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, हे नियम टप्प्याटप्प्याने लागू होणार असून, त्याचा परिणाम आगामी शैक्षणिक वर्षांतील प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे.
२०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून नर्सरीत प्रवेशासाठी मुलाचे वय ३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल. २०२८-२९ पासून ज्युनिअर केजीसाठी ४ वर्षे, तर २०२९-३० पासून सीनियर केजीसाठी ५ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक असेल. त्यानंतर २०३०-३१ पासून पहिलीच्या प्रवेशासाठी मुलाचे वय ६ वर्षे पूर्ण असावे लागेल.
नव्या नियमांनुसार, संबंधित वर्षाच्या ३० जूनपर्यंत आवश्यक वय पूर्ण असणे गरजेचे आहे. मात्र, सध्या शाळेत शिकणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना या नव्या निकषांतून सूट देण्यात आली आहे. तसेच शाळाप्रमुखांना काही परिस्थितींमध्ये १५ दिवसांपर्यंत वयोमर्यादेत शिथिलता देता येणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश नियमांमध्ये एकसमानता आणणे हा या निर्णयाचा उद्देश आहे.





