
राजकारणातील चाणक्य कोण, तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार. आता पवार साहेबांना चाणक्य म्हणतात ते त्यांच्या कुटनितीच्या राजकारणासाठी, असं आम्ही नाही तर त्यांचे विरोधक म्हणतात. असो, 85 वर्षांचे पवार साहेब नुकतेच राज्यसभेचे खासदार झाले. खासदार झाल्याबरोबर त्यांनी, एक नवा वाद ओढवून घेतला. तसं यापूर्वीही पवारांनी धर्मनिरपेक्षतेचा झेंडा घेत हिंदू संप्रदायाबाबत अनेकदा वादग्रस्त विधानं केलीत. परंतु यावेळी त्यांनी हिंदूत्ववाद्यांच्या नाही तर थेट वारकऱ्यांच्या स्वाभिमानावर घाव घातला. “वारकरी सांप्रदायात 60 टक्के कट्टरपंथी हिंदू आहेत. त्यामुळे वारकरी पंथामध्ये धार्मिक धर्मांधता वाढत आहे,” असं म्हणत त्यांनी वारकरी सांप्रदायाचं व धर्माचं काम करणाऱ्या संत-महंतांनाच टार्गेट केलं. त्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तर थेट वारकरी सांप्रदायातील 20 संतांची व महाराजांची नावे जाहीर करत, या महाराजांना थेट घुसखोर म्हटलं. लवांडे यांच्या याच वक्तव्याने सध्या महाराष्ट्र अशांत झालाय. लवांडे यांनी जाहीर केलेल्या संत-महंतांच्या यादीत, अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन महाराजांची नावे आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याही चांगलाच पेटलाय. तिकडे, पंढरपुरातही वारकरी संप्रदायातील वेगवेगळ्या संघटनांनी लवांडे व शरद पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेत अटकेची मागणी केलीय. एकंदर, सगळ्या महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदाय पेटून उठलेला असताना वारकऱ्यांचा हा रोष शरद पवारांना या वयात परवडेल का? हा प्रश्न विचारला जातोय. शरद पवारांनी हे विधान का केलंय, आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अनेकदा वादग्रस्त विधान केल्यानंतर चर्चेत आले आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बोटावरची शाई पुसून दोनदा मतदान करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं. मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही त्यांनी अनेकदा जातीयवादी टिपण्णी केलेल्या आहेत. आता याच शरद पवार वारकरी सांप्रदायाबाबत पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं. “वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असून त्यामुळं धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे,” असं वक्तव्य शरद पवार यांनी एका साहित्य संमेलनात बोलताना केलं. वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी विचारांची घुसखोरी होत असल्याचं दिसतं. संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांच्या मांडणीमुळं धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे. त्यामुळं अशा प्रवृत्तींची नोंद घेण्यासाठी आम्ही यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे, असं पवार यांनी म्हटलं होतं. या विधानानंतर विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी एक पाऊल पुढे टाकत वारकरी संप्रदायातील 20 कथित ‘घुसखोरांची’ नावं जाहीर केली. या कृतीमुळं वाद अधिकच तीव्र झाला.
विकास लवांडे यांनी जाहीर केलेल्या घुसखोर संतांच्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन संतांची नावे होती. त्यामुळे संपूर्ण नगर जिल्हा पेटला. नेवासा, श्रीरामपूर, नगर, पाथर्डी, शेवगाव यासारख्या तालुक्यांत विकास लवांडे व शरद पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. लवांडे यांनी पत्रकार परिषद तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही यादी जाहीर करत, वारकरी संप्रदायात काही व्यक्ती द्वैध भूमिका घेत असल्याचा आरोप केला. “सनातन वैदिक धर्म आणि भागवत वारकरी संप्रदाय या दोन्हींपैकी एकाच परंपरेशी निष्ठा ठेवावी. दोन्ही गादींवर एकाचवेळी उभं राहणं म्हणजे घुसखोरीच आहे,” असं ते म्हणाले. “या 20 महाराजांचा टप्प्याटप्प्याने पर्दाफाश करत राहणार,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेमुळं वाद अधिकच चिघळला. विशेषतः यादीत काही संत-महंतांची नावे आल्यानं नाराजीची लाट उसळली.
पंढरपूर येथील संत कबीरदास महाराज मठात दोन दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील फडकरी, दिंडीकरी, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संतांच्या वंशजांची बैठक पार पडली. या बैठकीतही विकास लवांडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं. लवांडे यांनी ज्या संतांची नावे ‘घुसखोर’ म्हणून उल्लेखिली, त्या संदर्भात त्यांनी तत्काळ संबंधित संतांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. लवांडे यांना तातडीनं अटक करण्याची मागणीही झाली. त्यासंदर्भात पंढपूर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलं. यानंतरही शासनाने कारवाई केली नाही, तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभं करण्याचा इशारा वारकरी संप्रदायानं दिला. नेवाशातही आ. विठ्ठल लंघे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला.
लवांडे यांच्या यादीत मुळचे बेलापूर येथील व अयोध्या येथील राम मंदीराचे ट्रस्टी गोविंद देवगिरी महाराज, देवगड येथील महंत भास्करगिरीजी महाराज, तसेच सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांची नावे आहेत. याशिवाय वारकरी भूषण बंडातात्या कराडकर, भाजपचे वारकरी आघाडीचे तुषार भोसले, चारुदत्त आफळे, बुलढाणा येथील प्रकाश जवंजाळ, अक्षय भोसले, संग्रामबापू भंडारे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन, एकनाथ सदगीर महाराज, ज्ञानेश्वर जवळीकर महाराज, संजय पाचपोर महाराज, संजयनाना धोंडगे महाराज, पंढरपूर येथील चंद्रशेखर देगलुरकर महाराज अशा अनेक महाराजांची नावे होती. या संपूर्ण प्रकरणानंतर विविध हिंदू संघटना आक्रमक झाल्या. वारकरी संप्रदायाचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला. संत-महात्म्यांची नावे अशा प्रकारे जाहीर करणे हा परंपरेचा अवमान करणारी कृती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी निषेधाच्या हालचालीही सुरू झाल्याचे चित्र आहे.
आता प्रश्न आहे, तो शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाने हा वाद आत्ताच का ओढवला. तर राजकीय विश्लेषकांच्या मते, शरद पवार कोणतंही वक्तव्य टायमिंग पाहून करतात. सध्या बारामती व राहुरीची पोटनिवडणूक सुरु आहे. परंतु शरद पवारांनी बारामती तालुक्यातील एकाही संत-महंतांचं नाव या यादीत घेतलं नाही. उलट राहुरीची निवडणूक सुरु असताना राहुरीच्या आसपास असणाऱ्या श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यातील संतांची नावे घुसखोर म्हणून जाहीर केली. आता त्याचा परिणाम म्हणून, शरद पवार यांच्या पक्षापासून दूर गेलेला बिगर हिंदू समाज म्हणजे, मुस्लिम- दलित हा समाज आपल्या पक्षाकडे येईल, हे टायमिंग शरद पवारांनी साधलं. भास्करगिरीजी महाराज, रामगिरीजी महाराज किंवा थेट गोविंदगिरीजी महाराज यांना मानणारा मोठा वर्ग राहुरी विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात आहे. परंतु त्यांनाच जर घुसखोर म्हटलं तर, सहाजिकच बिगर हिंदू समाज हा शरद पवार गटाकडे येण्याच्या संधी वाढतात. राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार गटापेक्षा, वंचित बहुजन आघाडीकडे दलित व मुस्लिम समाज आकर्षित झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपला परंपरागत मतदार पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठीच, शरद पवार गटाकडून अशी वक्तव्य झाल्याचा अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी लावलाय. आता हे किती खरं किती खोटं, हे 4 मे नंतर कळेलच. परंतु सध्यातही वारकरी सांप्रदायाची नाराजी शरद पवार व त्यांच्या पक्षाला पेलेल का, हा प्रश्न आहे.





