
ऑगस्ट कोरडा गेला तसाच सप्टेंबर पण कोरडा जाणार का अशी भीती शेतकऱ्यांना आहे. अशातच हवामान खात्याने नवा अंदाज जाहीर केला आहे. पुढचे १५ दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
नागपूर वेधशाळेच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुढील काळात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे विदर्भात मान्सूनच्या सक्रिय पावसाला पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पुढील ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता खूपच कमी राहू शकते. त्यानंतरही मोठ्या पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचा अंदाज देण्यात आला आहे. स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी हलका किंवा तुरळक पाऊस पडू शकतो; मात्र व्यापक पावसाची शक्यता कमी असल्याचं वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी सांगितलं.
सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि सिंचनाच्या पर्यायी साधनांचं नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.





