
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची आगामी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी शेतकरी सभासदांकडून होत आहे. संभाव्य दुष्काळ आणि बँकेवरील वाढता एनपीएचा बोजा लक्षात घेता, निवडणुकीवर कोट्यवधींचा खर्च करण्याऐवजी सहमतीने संचालक मंडळ निवडण्याची भूमिका पुढे येत आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेला सहकारातील बिनविरोध निवडणुकीची जुनी परंपरा आहे. १९६३ पासून अनेकदा निवडणुका सहमतीने पार पडल्या. १९७२च्या भीषण दुष्काळातही ही परंपरा कायम राहिली होती.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. यंदाही अनेक जागांवर सहमती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, तालुकानिहाय सहकारातील वर्चस्वामुळे काही ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता आहे. विखे-थोरात यांच्यासह सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशी अपेक्षा सभासद व्यक्त करत आहेत.





