
नगर तालुक्याचा आवाज जिल्हा बँकेत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी तालुक्याचा स्वतःचा प्रतिनिधी असणे गरजेचे असल्याचे आमदार अक्षय कर्डीले यांनी म्हटले आहे. निंबळक येथे जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, नगरसेवक आणि ठरावातील मतदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगर तालुक्यातील १०७ पैकी १०२ ठराव झालेले मतदार उपस्थित होते.
कर्डीले यांनी सांगितले की, जिल्हा बँक ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संस्था असून ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यासाठी स्थानिक प्रतिनिधीची भूमिका महत्त्वाची ठरते.
तालुक्याचा उमेदवार बँकेत गेल्यास शेतकऱ्यांच्या अडचणींना योग्य व्यासपीठ मिळू शकते, असा दावा त्यांनी केला. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य दिल्याचेही अक्षय कर्डीले यांनी नमूद केले. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नगर तालुक्याचा प्रतिनिधी कोण? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





