
तारीख २३ मे २०२०… सायंकाळचे सात वाजले होते… आणि श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगावच्या शिवारात अचानक बंदुकीच्या गोळीबाराचा आवाज घुमला. काही क्षणांतच या गोळीबाराने एका व्यक्तीचा जीव घेतला… या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली.
मंडळी, जागेच्या वादातून राजू उर्फ राजेंद्र बाबासाहेब गांगुर्डे आणि इतर आरोपींचा हौशिराम साळवे, काही साक्षीदार आणि गणेश गांगुर्डे यांच्याशी वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्याचवेळी राजू गांगुर्डे याने हातातील पिस्तूल गणेश गांगुर्डे यांच्या छातीवर रोखून गोळी झाडली आणि गणेश गांगुर्डे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी २४ मे रोजी हौशिराम साळवे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
खटल्यात सरकारी पक्षाने १५ साक्षीदार तपासले.
काही साक्षीदार फितूर झाले, मात्र मृताची पत्नी, फॉरेन्सिक अहवाल, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष आणि इतर पुरावे न्यायालयाने विचारात घेतले. या पुराव्यांच्या आधारे सत्र न्यायालयाने राजू उर्फ राजेंद्र गांगुर्डे याला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.





