
१९ सप्टेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार होते. मात्र, या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी २०२५ मधील आंदोलनाच्या नियमभंगाचा दाखला देत हा निर्णय घेतला.
पोलिसांच्या पत्रानुसार, आझाद मैदानातील आंदोलनासाठी २०२५ मध्ये लागू करण्यात आलेल्या नियमांमध्ये आमरण उपोषणाला परवानगी नसल्याचं नमूद आहे. याशिवाय आंदोलनासाठी एका दिवसाचीच परवानगी देता येते आणि वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. अंतरवाली सराटीतील सभेत त्यांनी आंदोलनाबाबत आक्रमक भूमिका घेत सरकारला स्पष्ट इशारा दिला.
त्यामुळे आता पोलिसांच्या परवानगीशिवाय जरांगे पाटील मुंबईत पोहोचल्यास पुढे काय घडणार? आंदोलनाचा मार्ग बदलणार की संघर्ष आणखी तीव्र होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.





