
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मंडळी, कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम राबवला जात आहे. यामध्ये अहिल्यानगर, पारनेर आणि पाथर्डी तालुक्यातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्राबाहेरील अभ्यास दौऱ्यात सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल. तो अर्ज कसा करायचा? जाणून घेऊयात.
या दौऱ्यात आधुनिक फलोत्पादन तंत्रज्ञानासोबतच फळांची प्रतवारी, हाताळणी, काढणीनंतरची प्रक्रिया, मोठ्या प्रक्रिया उद्योगांची कार्यपद्धती आणि बाजारपेठेतील विपणन व्यवस्थेचा प्रत्यक्ष अभ्यास करता येणार आहे.
याशिवाय आधुनिक लागवड पद्धती आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानाची शास्त्रोक्त माहितीही शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे आणि शेतमालाला अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो.
या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर इच्छुक शेतकऱ्यांनी २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जात नाव, गाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि पिकाचा तपशील अचूक द्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.





