
नगर–कल्याण महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या शिवारात भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय साहिल कैलास इंगावले याचा जागीच मृत्यू झाला.
साहिल हा म्हसोबा झाप येथील रहिवासी असून, तो हिरो स्पेंडर दुचाकीवरून नगर–कल्याण महामार्गाने जात होता. २१ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास बाबा का ढाबा हॉटेलसमोर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरकडे जाणाऱ्या महिंद्रा मॅक्स पिकअपने विरुद्ध बाजूने येत साहिलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर साहिल गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पिकअप चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी बाळासाहेब झावरे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी पिकअप चालक दिनेश खोडदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.





