
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगडावर सध्या एका विहिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. परिसरात तब्बल दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने तलाव, बंधारे आणि अनेक विहिरींची पाणीपातळी घटली आहे. मात्र, भगवानगडावरील विहीर मुबलक पाण्याने भरलेली दिसत आहे.
विशेष म्हणजे या विहिरीपासून अवघ्या दीडशे फुटांवर नागळवाडी येथील खासगी विहीर कोरडी पडल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे भगवानगडाच्या विहिरीतून अन्नदान, गोशाळा आणि सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात असूनही पाणीपातळी टिकून आहे.
या घटनेनंतर भाविकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. गडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. महंत कृष्णा महाराज शास्त्री आणि जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून विहिरीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. हजारो भाविकांनी यावेळी जल्लोष केला. हा चमत्कार आहे की भूगर्भातील पाण्याचे गूढ ? यावर मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.





