
अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर गावातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बाळासाहेब पांडुरंग पिसाळ आणि कीर्ती बाळासाहेब पिसाळ या दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळले.
सावकाराच्या कथित जाचाला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात होता आणि धमकावलं जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच त्रासामुळे बाळासाहेब अस्वस्थ होते, असंही सांगितलं जात आहे.
मात्र, या प्रकरणातील आरोपांची चौकशी होऊन सत्य समोर येणं महत्त्वाचं आहे. संबंधित खासगी सावकारांविरोधात कठोर कारवाई करावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.
या घटनेने सर्वाधिक वेदना दिल्या त्या त्यांच्या दोन चिमुरड्यांच्या आयुष्याने! अवघ्या दहा वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांची मुलगी आई-वडिलांच्या मायेला कायमची मुकली.
कर्जाचा प्रश्न असो किंवा सावकाराचा दबाव, अशा परिस्थितीत मदत मागणं आणि कायदेशीर मार्ग स्वीकारणं महत्त्वाचं आहे.





