
रविवारची पहाट… रस्त्यावर तीन दुचाकींची जोरदार धडक आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं ! अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर घडलेल्या या भीषण अपघातात एका तरुणीसह दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास एस आकाराच्या नागमोडी कॉर्नरजवळ हा अपघात झाला. नाशिकहून नेवाशाकडे येणाऱ्या दोन दुचाकींवरील तरुण-तरुणींची श्रीरामपूरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला धडक बसली.
या दुर्घटनेत नाशिकच्या पंचवटी येथील १७ वर्षीय स्वाती सोमनाथ जाधव आणि श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील १८ वर्षीय गणेश मच्छिंद्र गायकवाड यांचा मृत्यू झाला. ऋषिकेश गोडे, श्रावणी निकम आणि ओम परदेशी हे तिघे गंभीर जखमी झाले, तर विशाल गुंजाळ आणि यश पडघन यांनाही दुखापत झाली.
नाशिकहून आलेले तरुण-तरुणी मढी येथे दर्शनासाठी जात असल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील तरुण ज्योत घेऊन गावाकडे जात असल्याचे समजते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.





