
दुष्काळात चाऱ्याची चिंता… पण याच काळात एका गायीने गाठली तब्बल २ लाख ११ हजारांची किंमत ! श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील प्रगतशील शेतकरी महेश ताके यांनी जातीवंत गायीचे काळजीपूर्वक संगोपन करून पशुपालनाची ताकद दाखवून दिली आहे.
शेतीची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी गायीच्या आहाराकडे, आरोग्याकडे आणि देखभालीकडे विशेष लक्ष दिले. दुष्काळी परिस्थितीत चारा आणि पाण्याची अडचण असतानाही संगोपनात कोणतीही कमतरता ठेवली नाही.
त्यांच्या संगोपनातील या जातीवंत गायीला तब्बल २ लाख ११ हजार रुपयांची विक्रमी किंमत मिळाली. या विक्रीमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे, हा आनंद ताके कुटुंबाने अनोख्या पद्धतीने साजरा केला. शिरसगावातील सुमारे ७० मान्यवर, शेतकरी आणि मित्रपरिवाराला फेटे बांधण्यात आले.
गायीला हार आणि फेटा घालून तिचा सन्मान करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीत गायीला निरोप देण्यात आला. दुष्काळातही मेहनत, काळजी आणि पशुपालनातून मिळालेल्या या यशाची परिसरात चर्चा रंगली आहे.





