
सहा दशकांची प्रतीक्षा संपली… डिंभे-माणिकडोह बोगद्याला मंजुरी मिळाली, आणि दक्षिण अहिल्यानगरच्या दुष्काळमुक्तीच्या आशेला नवी दिशा मिळाली!
कुकडी प्रकल्पातील डिंभे ते माणिकडोह हा १६ किलोमीटरचा बोगदा अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र आता या प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. खरेपाहता या प्रकल्पासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळेच निधी प्राप्त झाला आणि प्रशासकीय मंजुरी मिळाली हे सगळ्यांना मान्य करावे लागेल.
स्वपक्षातील व विरोधातील नेत्यांना सुद्धा ही गोष्ट मान्य करावी लागेल. कारण की याआधी सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्याला अनेक महत्त्वाची मंत्रिपद मिळालीत पण कोणीच हा विषय मार्गी लावू शकले नाही.
पुणे जिल्ह्याकडे जलसंपदाचे खाते असायचे यामुळे हा विषय कधीच मार्गी लागला नाही. याआधी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दक्षिण अहिल्यानगरच्या दुष्काळमुक्तीचा मुद्दा सातत्याने पुढे नेत हा प्रकल्प निवडणुकीच्या अजेंड्यावर आणला होता.
आता त्यांच्या पाठपुराव्याला मंजुरीच्या रूपाने महत्त्वाचा टप्पा मिळाल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. याशिवाय, या बोगद्यासाठी पाचपुते पिता-पुत्र यांनीही सतत पाठपुरावा केला.





