Explained

Bhausaheb Waghchoure यांना शिंदे गटानं काय-काय दिलं? ६ खासदार का फुटले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे २०२२ ला केलं होतं, त्याची पुनरावृत्ती पुन्हा २०२६ मध्ये होताना दिसतेय. फरक फक्त एवढाच की, त्यावेळी हा गट पळून थेट गुवाहटीला पोहोचला होता, व आता जो सहा जणांचा गट आहे, तो थेट दिल्लीत पोहोचलाय. कदाचित, बातमी पब्लिश होईपर्यंत ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटांत दाखल झालेले असतील. महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे. ऑपरेशन टायगरअंतर्गत शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाचे एक तृतीआंश म्हणजेच सहा खासदार फोडले आहेत.

हे सर्व खासदार सध्या दिल्लीत असून सकाळी ११ वाजता, ते शिंदे पितापुत्रांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे फुटलेल्या या खासदारांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हेही असल्याचे सांगितले जातेय. महाराष्ट्रात ही चर्चा सुरु असतानाच ठाकरे गटाचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या संजय राऊत यांनी, या खासदारांवर प्रत्येकी १५ कोटी ऑफर केल्याचा आरोप केलाय. म्हणजेच शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे १५ कोटी रुपये घेऊन, पक्षांतर करत असल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे. अर्थात या आरोपाला पुरावे नसले तरी, हाच आरोप नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मात्र नक्कीच परिणाम करणारा ठरणार आहे. नेमकं काय चाललंय, शिवसेनेत आणि नगरचं राजकारण का ढवळलंय?

दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्या. त्यापैकी शिर्डीत ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपच्या विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. लोखंडे यांची हॅट्र्रीक हुकली. परंतु वाकचौरे खासदार झाल्यानंतर जिल्ह्यातील व राज्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलली. लोकसभेनंतर झालेल्या सर्वच निवडणुकांत मविआचा सुपडा साफ झाला. महायुती व त्यातल्या त्यात भाजपने दिमाखदार पुनरागमन केलं. नगर जिल्ह्यातही १२ पैकी १० आमदार महायुतीने निवडून आणले. राज्यात व देशातही भाजपची सत्ता असल्याने विरोधकांत अस्वस्थता पसरली.

नगर जिल्ह्यातील ठाकरे गट फक्त नावालाच राहिला. नेता असूनही कार्यकर्ते नाहीत, अशी सध्या जिल्ह्यातील ठाकरे गटाची अवस्था आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांत वाकचौरे हे कोणत्याही कार्यक्रमात न दिसल्याने, त्यांच्याबाबतही नाराजी वाढली. नगर उत्तरेतील कित्येक तालुक्यात वाकचौरे दाखवा आणि बक्षिस मिळवा, अशी टिका विरोधकांनी सुरु केली. काम करण्यास निरुत्साह, निधीची कमतरता आणि छोट्या-मोठ्या आजारपणामुळे खा. वाकचौरे असून नसल्यासारखे राहिले. गेल्या १५ दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीलाही ते अनुपस्थित राहिले.

आता हेच वाकचौरे, थेट शिदे गटांत दाखल होत असल्याच्या चर्चा आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्यात आल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि हे सहा खासदार सध्या दिल्लीत असून बुधवारी सकाळी ते लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना आपल्या स्वतंत्र गटाचा पाठिंबा असल्याचे पत्र सादर करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सोबत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या नऊपैकी सहा खासदारांना गळाला लावण्यात यश मिळवले. आपले खासदार फुटणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता ठाकरे गटात हालचालींना वेग आला आहे.

ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरु आहे. त्यामुळे ठाकरे गटाने खासदारांनी फुटून स्वतंत्र गट स्थापन केल्यास काय करायचे, यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेतला असल्याचे सांगितले जातेय. ठाकरे गट या फुटीर खासदारांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

व्हीप पाठवल्यानंतर खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यानंतर जशी बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली होती अगदी तशीच खासदारांची बैठक आताही फुटीच्या उंबरठ्यावर घेण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरु आहे. खासदारांना कायदेशी रित्या बैठकीसाठी व्हीप जारी करून अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत हे यासंबंधी व्हीप जारी करुन कायदेशीररित्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासंबंधी सूचना देऊ शकतात, असेही सांगितले जात आहे.

त्यापूर्वी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या खासदारांना प्रत्येकी १५ कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला. राऊतांच्या या आरोपानंतर वाकचौरे यांनी खरंच १५ कोटी घेतलेत का, अशा चर्चा शिर्डी मतदारसंघात सुरु झाल्या. वाकचौरे यांच्याखेरीज संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील हे खासदार फुटतील, असे सांगितले जात आहे. आता या खासदारांना शिंदे गटाने नेमकी काय ऑफर दिलीय याच्याही चर्चा सुरु झाल्यात…

-या खासदारांना शिंदे गटात आल्यावर भरपूर विकासनिधी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगितले जातेय.
-या सहा खासदारांपैकी मराठवाड्यातील एका खासदाराला थेट केंद्रीय राज्यमंत्रीपदही ऑफर करण्यात आलेय.
-हे सहा खासदार दिल्लीत अमित शहांचीही भेट घेणार असल्याचे कळतेय. त्यामुळे थेट केंद्राकडूनही काहीतरी लाभ या खासदारांना मिळेल, अशाही चर्चा आहेत.

आता हे सगळं असलं तरी, वाकचौरेंच्या या निर्णयावर शिर्डीकर खूश असतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दोन वर्षे मतदारसंघात न फिरकरणारा खासदार थेट दोन वर्षानंतर नव्या पक्षात दिसणार असल्याने शिर्डीकरांना नक्कीच धक्का बसलाय. महायुतीचे कार्यकर्तेही वाकचौरेंना समावून घेतील का, हाही प्रश्न आहेच. उलट वाकचौरेंना खासदार करण्यासाठी महाविकास आघाडीतील शरद पवार गट व काँग्रेसने जास्त ताकद लावली होती. ठाकरे गटाची ताकद कमी असूनही, शिर्डी मतदारसंघात वाकचौरे निवडून आले होते. परंतु आता तेच वाकचौरे थेट सत्तेत सहभागी होणार असल्याने मविआच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासघात नक्कीच होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button