Explained

Explained : Jamkhed Nagar Parishad | रोहित पवार-राम शिंदेंची टशन पुन्हा रंगणार; जामखेड नगराध्यक्षपदाचा मान कुणाला मिळणार?

11 जून 2015 साली जामखेड ग्रामपंचायत बरखास्त होऊन त्याऐवजी नगर परिषदेची स्थापना झाली. त्यानंतर 2016 मध्ये पहिल्यांदा नगर परिषदेच्या निवडणूका झाल्या. त्यात पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान प्रिती विकास राळेभात अर्चना सोमनाथ राळेभात व निखिल घायतडक यांनी मिळवला. आता रखडलेली दुसरी निवडणूक येत्या दोन महिन्यांत होत आहे. यावेळीही नगराध्यक्ष होण्याचा मान सर्वसाधारण महिलेला मिळणार आहे. यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने जो कामाचा, तोच खुर्चाचा… या न्यायाने फैसला होणार आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेला आरक्षित असल्याने तब्बल डझनभर पतीदेवांनी आपल्या पत्नीची फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक राजकारणाचा विचार करता, सभापती राम शिंदे व आ. रोहित पवार यांच्यात पुन्हा एकदा काटें की टक्कर पहायला मिळणार आहे. परंतु गेल्या काही दिवसांत जामखेडची बदलेली राजकीय समि‍करणे पाहता आ. रोहित पवारांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे सांगितले जात आहे. नेमकी कशी आहे जामखेडची स्थिती? नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार कोण? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना दिवाळीनंतर जोर आलाय. नगराध्यक्षपद व प्रभागातील आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इच्छुकांचे चेहरे समोर येऊ लागले आहेत. येत्या 15 ते 20 नोव्हेंबरपर्यंत नगर परिषदेच्या निवडणुका होतील, असे सांगितले जात आहे. जामखेडच्या राजकारणाचा विचार करता, गेल्या तीन-चार वर्षांत जामखेडचे राजकारण मोठ्या प्रमाणात बदललेले दिसून येत आहे. 2019 च्या निवडणुकीत आ. रोहित पवारांना उचलून धरणाऱ्या या तालुक्याने, 2024 मध्ये मात्र रोहित पवारांना चांगलेच झुंजवल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरुन दिसले. पराभूत झालेल्या राम शिंदे यांचे भाजपने जोरदार पुनर्वसन केले. थेट विधान परिषदेच्या सभापतीपदाची संधी कर्जत-जामखेड मतदारसंघाला पहिल्यांदा मिळाली. राम शिंदे यांचे राजकीय वजन वाढल्याने जामखेडच्या राजकारणातही कालानुरुप अनेक बदल झाले. रोहित पवारांचे खंदे समर्थक ओळीने भाजपमध्ये दाखल झाले. पक्षांतराचा हा सिलसिला अजूनही सुरुच आहे. त्यामुळे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही नेते जोर लावतील व ही निवडणूक न भूतो न भविष्यती गाजेल, असे अंदाज बांधले जात आहेत.

स्थानिक राजकारणाचा विचार केला तर, भाजपकडून सुनीता मधुकर राळेभात, प्रांजल अमित चिंतामणी, अर्चना सोमनाथ राळेभात यांची नावे चर्चेत आहेत. महायुतीकडून भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या वर्षा कैलास माने याही इच्छुक आहेत. याशिवाय पायल आकाश बाफना, कोमल बिभीषन धनवडे अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष सलीम बागवान यांच्या पत्नी व आम आदमी पक्षाचे आसिफ शेख हेही आपल्या पत्नीसाठी आत्तापासूनच फिल्डींग लावून बसले आहेत. याशिवाय अजित पवार गटाचे नेते महेश निमोणकर हेही आपल्या पत्नीला नगराध्यक्ष करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय रोहित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्चना संपत राळेभात, प्रीती विकास राळेभात यांचीही नावे चर्चेत आहेत.

थेट जनतेतून सरपंच निवडणार असल्याने अनेक नेत्यांनी आत्तापासूनच जनसंपर्क वाढविला आहे. रस्त्यांची कामे, नळ्या, वीज वितरणाचे खांब, मुरुम आदींच्या माध्यमातून अनेकांनी स्वखर्चातून विकासकामे सुरु केली आहेत. पक्षाने तिकीट दिले काय किंवा डावलले काय… अनेकजण अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरु झालेला प्रचार सध्या रंगतदार होताना दिसत आहे. काही इच्छुक नगराध्यक्षांच्या पतींनी तर थेट काही नगरसेवकांचा खर्च उचलण्याची तयारीही सुरु केल्याच्या चर्चा आहेत.

या निवडणुकीची खरी रंगत तिकीट वाटपानंतर व नगराध्यक्षपदाचा उमेदवार सिलेक्ट झाल्यानंतरच येणार आहे. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांकडून बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button